लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संपूर्ण ३६८ बेड कोरोना उपचारासाठी उपलब्ध करण्यात आले असून, यातील एनसी कक्षात दहा बाधित मातांना दाखल करण्यात आले असून, या कक्षात काही बेड हे गर्भवती महिला व मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. बेड उपलब्ध होताच काहीच तासात या ठिकाणी रुग्ण दाखल झाले असून, सायंकाळपर्यंत ३२ ऑक्सिजन बेडची उपलब्धता हेाती. दरम्यान, व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेसंदर्भातही एक समिती तयार करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. दरम्यान, कोरोनातून बरे होऊन कर्तव्यावर परतल्यानंतर ४८ तासात पूर्ण रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी गुरुवारपासून सर्व बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले असून, यात विशेष नवजात शिशू काळजी कक्षातील अतिदक्षता विभागाचाही समावेश आहे. दरम्यान, कोरोनातून बरे होऊन चार डॉक्टर परतल्याने मनुष्र्यबळाचा तेवढा मुद्दा थोड्या प्रमाणात सुटला आहे. प्रतिनियुक्तीवरील कोणते डॉक्टर आलेले नाहीत, याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी माहिती मागविली आहे.
बेड राखीव
एएनसी कक्ष हा उपलब्ध करून देण्यात आला होता. यात तातडीने दहा महिला दाखल झाल्या. हे प्रमाण वाढण्याची शक्यता बघून या कक्षातील बेड हे गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
संध्याकाळपर्यंतची स्थिती होती अशी
जुना अतिदक्षता विभाग : १६ बेड, १६ रुग्ण
आपत्कालीन विभाग अतिदक्षता विभाग: १० बेड, १० रुग्ण
१४ नंबर अतिदक्षता विभाग १० बेड, १० रुग्ण
एसएनसीयू अतिदक्षता विभाग १० बेड, ९ रुग्ण
कॅज्यूलटी वार्ड ५ बेड, ४ रूग्ण
सीटू ६४ बेड, ६२ रुग्ण
सी ३, २४ बेड, २३ रुग्ण
वॉर्ड ७, ८ : ४१ बेड, ४१ रुग्ण
वॉर्ड ९ : १९ बेड, १९ रुग्ण
वॉर्ड १० : १७ बेड, १६ रुग्ण
वॉर्ड १२ : ३७ बेड, ३७ रुग्ण
वार्ड १३: २४ बेड, २४ रुग्ण
वॉर्ड : ७ बेड, २ रुग्ण
पीएनसी : ३७ बेड, ३७ रुग्ण
एएनसी : २४ बेड, १० रुग्ण
एकूण ३६८ बेड, ३३२ रुग्ण, ३६ बेड रिक्त
परिचारिकांची सेवा वर्ग
एनएसयूआय विभागातील एनएचएम अंतर्गत कंत्राटी कार्यरत ४ बालरोगतज्ज्ञ, इन्चार्ज सिस्टर, स्टाफ नर्सेस व सपोर्ट स्टाफ यांना एनएसयूआय विभागातील कोविड बाधित बालकांवर उपचार करण्यासाठी निुयक्त करण्यात आले असून, तसेच आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले आहेत.