जळगाव : वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण प्रशासनाने शिवाजीनगरातील अनेक नागरिकांचे घरातील वीज मीटर विद्युत खांब्यावर एका प्लॅस्टीक बॉक्स मध्ये बसविले आहेत. मात्र, उष्णतेमुळे हे प्लॅस्टीक बॉक्स गरम होऊन, वारंवार या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आगीच्या घटना घडत असल्यामुळे, महावितरण प्रशासनाने या ठिकाणाहून हे मीटर काढून संबंधित नागरिकांच्या घराबाहेरील मोकळ्या जागेत बसवावे, या मागणीसाठी मंगळवारी शिवाजी नगरचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महावितरणच्या अभियंत्यांची भेट घेऊन, त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
महावितरणतर्फे वीज चोरांविरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईत सुप्रिम कॉलनी, राम नगर, पिंप्राळा व शिवाजीनगर या भागातील नागरिक वीज मीटरमध्ये फेरफार करून विज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले होते. या विजचोरीवर उपाय म्हणून महावितरणने या भागातील नागरिकांचे घरातील वीजमीटर बाहेरील विद्युत खांब्यांवर एका फायबरच्या बॉक्समध्ये बसविले आहेत. वीजमीटर बाहेर बसविल्यामुळे नागरिकांना मीटरमध्ये फेरफार करणे अशक्य झाले आहे. मात्र, विद्युत खांब्यांवर बसविलेला हा प्लॅस्टीकचा बॉक्स उष्णतेने तापून आगीच्या घटना उद्भवत आहेत. या आगीत या बॉक्समधील मीटर जळत असल्यामुळे, नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. तरी हे मीटर तात्काळ काढण्याची मागणी नवनाथ दारकुंडे यांनी महावितरण अभियंत्यांकडे केली. यावेळी शिवाजीनगरातील नागरिकही उपस्थित होते.