यावल, जि. जळगाव : पक्षादेशाचे उल्लंघन केल्याने यावल नगरपालिकेचे नगरसेवक सुधाकर आनंदा धनगर व नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अपात्र घोषित केले.यावल नगरपालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या १५ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत देवयानी महाजन यांना पाणीपुरवठा सभापती पदासाठी सुचक किंवा अनुमोदक होण्यासाठी व त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षादेश बजावला होता. मात्र सुधाकर धनगर यांना यांनी पक्षाचे उल्लंघन करून स्वत: पाणीपुरवठा सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्ष देशाचे उल्लंघन झाले होते म्हणून अपात्र करण्यात यावे यासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे महर्षी व्यास शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांनी त्यांच्या गटातील नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना पक्षादेश बजावला होता त्यांचे उल्लंघन झाले होते म्हणून गटनेते राकेश कोलते यांनी जिल्हाधिकाºयांकडे रेखा चौधरी यांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने सुनावणी पूर्ण होऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रेखा चौधरी यांना अपात्र घोषित केले.
यावल नगरपालिकेचे दोन नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 2:16 PM