आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चॉकलेट्स खाणे आणि दातांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष न देणे यामुळे दातांचे विकार वाढून दात किडल्यानंतर काढावे लागतात. अशा परिस्थिल्त जळगावात दातांच्या डॉक्टरांकडे लहान मुलांची गर्दी वाढत आहे. त्यातच चॉकलेट्स कमी खावे आणि खाल्ल्यानंतर तातडीने चूळ भरून दात स्वच्छ करावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
लहान मुलांमध्ये चॉकलेट्स खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या छोट्या बाबींकडे पालकांकडूनही दुर्लक्ष केले जाते. सद्यस्थितीत घरातील मिष्ठान्नांची जागाही या चॉकलेट्सने घेतली असून त्याचा मात्र, दातांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, याकडे गांभीर्याने बघितलेच जात नाही. अखेर दातांमधील किड वाढून पुढे अनेक विकारांचा सामना करावा लागतो. या दातांमुळेच पुढे लहान मुलांमध्ये न्यूनगंडाची भावनाही वाढते, अशा स्थितीत निरोगी दातांसाठी योग्य काळजी लहान वयातच घेणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टर व्यक्त करतात.
चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे !
चॉकलेट्स खाल्ल्यानंतर ते दाताला चिकटतात या चिकटलेल्या चॉकलेटवर लागलीच जीवाणू हल्ला करतात. यामुळे दातावरची लेअर कमी होत जाते. तीन ते सहा महिन्यांच्या काळात दात किडायला सुरुवात होते. त्या ठिकाणी खड्डा पडून त्यात अन्न अडकते पुन्हा जीवाणू त्यावर जमा होतात पुढे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
लहानपणी किडतात दात
चॉकलेट खाणे किंवा अगदी लहान मुलांना साखरेचे दूध देणे यामुळे यातील साखर ही दाताला चिकटून राहते. याचे परिणाम दात किडण्यास सुरुवात होत असते. अशा स्थितीत हे दात खराब झाल्यानंतर मुलांच्या आत्मविश्वासातही फरक पडतो. समोरच्याचे दात अधिक स्वच्छ दिसत असताना यातून एक न्यूनगंडाची भावना उत्पन्न होते. त्याचे मानसिकही परिणाम होतात. दात किडल्यामुळे अन्न पचनावरही परिणाम होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.