जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे, एसटीच्या मालवाहतुकीच्या दरातही नुकतीच वाढ करण्यात आली आहे. जास्त किलोमीटरसाठी कमी दर व कमी किलोमीटरसाठी जास्त दर याप्रमाणे ही दरवाढ असून, एकूण तीन टप्प्यात ही दरवाढ केल्याचे जळगाव आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोना काळात एसटी महामंडळाची प्रवासी सेवा बंद असल्यामुळे, कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महामंडळाने पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून गेल्या वर्षापासून मालवाहतूक सेवा सुरू केली आहे.
एसटी बसचे रूपांतर ट्रकमध्ये करून, उद्योजक व व्यापाऱ्यांचा माल इतरत्र पोहोचविण्यात येत आहे. महामंडळाने पहिल्यांदाच अशा प्रकारे मालवाहतूक सुविधा सुरू केल्यामुळे, व्यापारी व उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने, महामंडळाने या मालवाहतुकीच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ वेगवेगळ्या तीन टप्प्यांत आहे. १०० किलोमीटरपर्यंत वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर ४२ रुपये आकारण्यात येणार आहेत. १०१ ते २५० किलोमीटर पर्यंत ४० रुपये प्रति किलोमीटर आकारण्यात येणार आहे. तर २५१ च्या पुढे ३८ रुपये प्रति किलोमीटरपर्यंत दर आकारण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीच्या अंतरावर माल पोहोचविण्यासाठी कमी दर व कमी अंतरावर माल पोहोचविण्यासाठी जादा दर आकारण्यात येणार आहे.
इन्फो :
अशी आहे सुधारित दरवाढ
१) १०० किलोमीटरपर्यंत जाताना रुपये ४० प्रती किलोमीटर व येताना रुपये ३८ प्रति किलोमीटरप्रमाणे. यामध्ये कमीत कमी ३५०० रुपये भाडे आकारणी.
२) १०१ किलोमीटर ते २५० किलोमीटर जाताना रुपये ३८ प्रति किलोमीटर व येताना ३६ रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे भाडे आकारणी होणार आहे.
३) २५१ किलोमीटरच्या पुढे जाताना रुपये ३६ प्रति किलोमीटर व येताना ३४ रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे भाडे आकारणी होणार आहे.