लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या ३७२ घटना घडल्या आहेत. तर जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला खारुताईने चावा घेतला होता. त्यावर त्यांनी उपचारदेखील घेतले.
जानेवारी महिन्यात देखील कुत्रा चावल्याच्या घटना ४३६ घडल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीला गायीने चावा घेतला आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात येऊन इंजेक्शनदेखील घेतले होते.
जिल्हा रुग्णालयात प्राणी चावल्यानंतर गरजेनुसार रेबिज आणि इतर इंजेक्शन्स रुग्णांना दिले जातात. गेल्या दोन महिन्यात कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. जानेवारीत तब्बल ४३६ जणांना कुत्रा चावला होता. त्यात २६३ पुरुष, ६२ महिला यासोबतच ७८ मुले आणि ३३ मुली आहेत. त्यासोबतच जानेवारी महिन्यात उंदीर चावल्यामुळे एकाने तर मांजर चावल्याने तीन जणांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले होते. जानेवारी महिन्यातच जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला खारुताई चावली होती. खारुताईला खाऊ घालताना या महिलेला तिने चावा घेतला होता. त्यावर त्यांनी प्रतिबंधात्मक उपचार घेतले असल्याची माहिती आहे.
फेब्रुवारी महिन्यात ३७२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यात २३२ पुरुष, ५१ महिलांचा समावेश आहे. तर ६६ मुले आणि २३ मुलींना श्वानदंशाचा सामना करावा लागला. या महिन्यात बिबट्याने हल्ला केलेल्या एकावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यासोबतच उंदरांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या तीन घटना होत्या. तर मांजरींनी चार जणांना चाव घेतला होता.
आकडेवारी
फेब्रुवारी
श्वान दंश ३७२
उंदीर चावणे ३
मांजर चावणे ४
बिबट्याचा हल्ला १
जानेवारी
कुत्रा चावणे ४३६
उंदीर चावणे १
मांजर चावणे ३
खारुताईचा चावा १