आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - विविध कारणांनी घरात मुलांसोबत कमी होत जाणारा संवाद व वाढत्या अपेक्षा यासह वेगवेगळ््या कारणांनी विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. या परिणामांमुळे विद्यार्थी आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेण्यापर्यंत पोहचू शकतात, अशीही शक्यता वर्तविली जात असून अपेक्षा मर्यादीत ठेवून कौटुंबिक संवाद वाढवा, असा सल्ला दिला जात आहे.दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून यामध्ये आता कोवळ््या वयातील मुलेदेखील अशा टोकाच्या निर्णयापर्यंत पोहचत आहे. या बाबत मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांनी आत्महत्यांची प्रसंगानुरुप वेगवेगळी कारणे असू शकतात व त्यांचा शोध घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.सहनशीलता झाली कमीदिवसेंदिवस ताणतणाव वाढतच असून बदलत्या जीवनशैलीने सहनशीलतादेखील कमी होत आहे. या सोबतच आजकाल पालकवर्ग मुलांना असे केले तर हे देईल, ते देईल असे सांगून एक प्रकारे प्रलोभणेच दाखवित आहे. नंतर मात्र त्यास नकार दिला तर मला काही महत्त्वच नाही, अशी मुलांची मानसिकता होते व मुले ही गोष्ट सहन करू शकत नाही. त्यामुळे ते तणावात जावून टोकाचा निर्णय घेऊ शकतात. यासाठी पालकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.वाढता एकलकोंडेपणाआजकाल मुले सोशल मीडियाच्याही आहारी गेल्याचे चित्र आहे. कमी वयात त्यांच्या हाती मोबाईल, संगणक आल्याने ते त्यातच रमतात व एकलकोंडे होतात. त्यामुळे त्यांचा इतरांशी संवाद तुटतो. या सोबतच पालकही याकडे दुर्लक्ष करीत आपापल्या कामात व्यस्त राहत मुलांना वेळ देत नाही. पूर्वी काही ताणतणाव आल्यास कुटुंबात तो सांगितला जात होता, मात्र आता हे प्रमाण कमी होत आहे. असे न होता कौटुंबिक संवाद वाढविणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला जात आहे.ताणतणावांचा शोध घ्यामुलांची सहनशीलता कमी होत असल्याने व वाढत्या अपेक्षा पेलल्या जात नाही यासह शालेय जीवनातील तसेच वेगवेगळ््या कारणांनी मुले तणावात जावू शकतात. त्यामुळे कुटुंबात चर्चा करून प्रत्येकाचा ताणतणाव जाणून घ्या, त्याबाबत मुलांना कौटुंबिक पातळीवर अथवा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करा, त्यांना तणावातून बाहेर काढले तर आत्महत्या सारख्या घटना रोखल्या जावू शकतात, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.पाच दिवसात चार आत्महत्यागेल्या पाच दिवसात शहर व परिसरात चार आत्महत्यांच्या घटना घडल्या असून यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. ८ फेब्रुवारी रोजी आठवीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुन्हा ९ रोजी रात्री एका दहावीतील विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपविली. त्यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी मेहरुण तलावात एक महिलाने तर एका प्ले स्कूलच्या संचालिकेने गळफास घेवून आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. अशा सततच्या आत्महत्यांच्या घटनांनी चिंता व्यक्त केली जात आहे.ही लक्षणे दिसताच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्याझोप न लागणे, अति झोपणे, उदासपणा, एकलकोंडेपणा, चिडचिडपणा, भूक न लागणे, वारंवार रडू येणे अशी वेगवेगळी उदासीनतेची लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे तज्ज्ञांनी सूचविले.आत्महत्येची कारणेशालेय जीवनातील यश हेच यशस्वी जीवनाचे प्रमाणक आहे, असा गैरसमज होणे, स्पर्धा ही आपल्यातील क्षमता वाढविण्यासाठी आहे व आपल्या प्रयत्नांचा कस लागावा, असा उद्देश ठेवत असताना भान नसणे, पालक व मुलांमध्ये संवादाची कमतरताकाय घ्यावी दक्षतामुलांना आत्मनिर्भर बनविण्याकडे कल असावा, प्रत्येक गोष्ट, सुखसोयी पुरविणे हा पालकांचा उद्देश नसावा, अभ्यासाव्यतिरिक्त छंद, खेळ, एखादी कला याकडे विद्यार्थी व पालकांनी लक्ष केंद्रीत करून ते चांगल्या प्रकारे जोपासावी, अभ्यासातील अडचणीबद्दल मोकळेपणाने शिक्षकांजवळ बोलायची सवय लावावी.
शालेय जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी मुलांनी शिक्षकांशी मनमोकळेपणे बोलले पाहिजे तसेच पालकांनीही मुलांशी संवाद वाढविला पाहिजे.- डॉ. कीर्ती देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ.सध्या ताणतणाव वाढून सहनशीलता कमी होत आहे. मुलांना प्रलोभणे दाखविल्यास व मुलांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते तणावात जातात. या बाबत पालकांनी दक्षता घ्यायला पाहिजे.- डॉ. प्रकाश चित्ते, मानसोपचार तज्ज्ञ.आत्महत्येची प्रसंगानुरुप वेगवेगळी कारणे असू शकतात. मुले असो अथवा घरातील कोणत्याही सदस्यास ताणतणाव असल्यास त्या बाबत घरात चर्चा होऊन मार्गदर्शन केले पाहिजे.- डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ.