सोयाबीनच्या ७५ टक्के उत्पादनात घट
(डमी)
तिळाचे उत्पादन घटले : सूर्यफूल, करडई हद्दपार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे तेलाच्या मागणीत वाढ होत असताना दुसरीकडे जिल्ह्यात तेलबीयांच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तेलबियांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन हे सोयाबीनचे घेतले जाते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. हीच स्थिती खान्देशात इतर ठिकाणीदेखील पहायला मिळत आहे. यासह जिल्ह्यात तीळ, सूर्यफूल, करडईसारख्या तेलबीयांची लागवड आता नसल्यासारखीच आहे.
जिल्ह्यात तेलबीयांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही जिल्ह्यात २५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची लागवड झाली होती. अतिवृष्टीमुळे सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले. यासह भुईमूगचा पेराही आता दरवर्षी कमी होत आहे. केवळ चोपडा, धरणगाव, अमळनेर तालुक्यातील काही भागातच भुईमुगाचा पेरा केला जातो. जिल्ह्यात शेंगदाण्यावरील प्रक्रिया केंद्र कमी आहेत तसेच माल विक्रीसाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. तसेच व्यापाऱ्यांच्या टोळीमुळे भावदेखील बऱ्यापैकी मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भुईमुगाच्या पेऱ्यात घट होत आहे. त्या उलट सोयाबीनच्या पिकाला चांगला भाव मिळतो. तसेच पावसाच्या पाण्यावरदेखील हे पीक येत असते. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, शेंगदाणा व सोयाबीनच्या तेलाच्या दरात ज्या प्रमाणे वाढ होत आहे. त्या प्रमाणात पेऱ्यात वाढ होत नसून, उलट हे क्षेत्र घटत जात आहे.
तेलपीक पेरणी क्षेत्रपीक
पीक - २०१९ - २०२० - घट - वाढ
सूर्यफूल - १९ - १७ - ०२ - ००
तीळ -५६९ - ४९८ - ७१ - ००
भुईमूग - २ हजार ३०० - १ हजार ७४२ - ६०० - ००
सोयाबीन -२७ हजार २०० - २५ हजार ६२० - १८०० - ००
तीळ, सूर्यफूल, करडई हद्दपार
सोयाबीनचा पेरा वाढत असताना दुसरीकडे तीळ, सूर्यफूल व करडई अशा तेलबीयांचा पेरा प्रत्येक वर्षी घटत आहे. योग्य बाजारपेठ नसणे, पाण्याची आवश्यकता यामुळे शेतकऱ्यांनी या तेलबीयांच्या पेरणीकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे. तीळ, सूर्यफूल ही पिके तर आता जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. करडईचेदेखील उत्पादन जिल्ह्यात ठरावीक क्षेत्रावरच घेतले जाते. भुईमुगाचा क्षेत्र आता कमी होत आहे. त्यादृष्टीने सोयाबीनचे उत्पादन स्थिर असून, कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते, तर सूर्यफुलाचे उत्पादन धरणगाव तालुक्यातच काही प्रमाणात घेतले जाते.
कोट..
सोयाबीनला चांगला भावदेखील मिळत असतो. तसेच बागायतदार असो वा कोरडवाहु अशा कोणत्याही प्रकारच्या शेतकऱ्याला हे पीक सोईचे आहे. त्यामुळे सोयाबीनलाच शेतकरी प्राधान्य देतात. त्या दृष्टीने तीळ किंवा सूर्यफूल जिकिरीचे पीक आहे. खुल्या बाजारात सूर्यफुलाला चांगला भाव मिळतोच असे नाही.
-दीपक पाटील, शेतकरी