लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची वाढत जाणारी मागणी व त्यात अमेरिकेत घटलेले कापसाचे उत्पादन यामुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता कॉटन बाजारात तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवडाभरात सरकीसह खंडीच्या दरात देखील वाढ होत आहे. यामुळे खासगी बाजारात कापसाचे दर ५७०० पर्यंत पोहचले आहेत. त्यातच सीसीआय व पणन महासंघाच्या केंद्रावर कापसाचे दर ५६०० पर्यंत खाली गेले आहेत. त्यातच ग्रेड व कटती लावली जात असल्याने शेतकऱ्यांनी आता आपला माल सीसीआयच्या केंद्रावर न आणता खासगी जिनींगकडे विक्रीस वळविला असल्याने सीसीआयची केंद्र ओस पडू लागली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कापुस बाजारात मंदीचे ढग कायम होते. तसेच अमेरिका व चीनच्या ट्रेड वॉरमुळे आंतराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमीच होते. मात्र, ट्रेड वॉर चा फारसा परिणाम यावर्षी पहायला मिळाला नाही. तसेच जागतिक मंदीचा फटका देखील यावर्षी फारसा कापूस बाजारात नाही. टेक्सटाईल्स बाजारात देखील आता कापसाचा उठाव आहे. यामुळे कापसाच्या दरात वाढ होत असल्याची माहिती कापुस उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. जगभरात अमेरिकेच्या कापसाला मोठा बाजार असतो. मात्र, यंदा अमेरिकेतील कापसाचे उत्पादन २५ ते ३५ टक्क्यांनी घटले आहे. यामुळे चीन, बांग्लादेश, व्हिएतनाम सारख्या देशांनी अमेरिकेऐवजी भारताकडून कापूस खरेदीला प्राधान्य दिले आहे. मागणी वाढल्याने कापसाच्या दरात वाढ होत असून, अजून ही मागणी कायम राहण्याची शक्यता असल्याने कापसाचे दर ६ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे.