कुरंगी, ता. पाचोरा : कुरंगी बाबरूड जिल्हा परिषदेच्या गटात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले असून परिसरात चोऱ्यांच्या घटना थांबत नसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सट्टा, मटका, जुगार, देशी-विदेशी, गावठी दारू, वाळू, गुटखा, गांजासह इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मागील दहा दिवसांत दहिगाव संत येथील अवैध दारूच्या भांडणावरून एका तरुणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. नांद्रा येथे श्रीराम आश्रमात चंदनाची चोरी झाली होती त्या घटनेची संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही कॅमे-यात हत्यारासह कैद झाले होते. त्यांचा तपास तीन वर्षांत लागत नाही . तोच नांद्रा येथील आश्रमाशेजारील शेतातून पुन्हा चंदन तस्करांनी चोरी केली. परिसरात दुचाकी गाडीचे चोरीचे सत्र दिवसारात्री सुरूच आहे. तर याच गटात बनावट दारूचा कारखाना सापडला होता. तर एका वयोवृद्ध नागरिकाचा संशयास्पद मृत्यू होऊन चोरी झाल्याचे दबक्या आवाजात परिसरात चर्चा दिसून येत आहे. या घटनांमुळे सामान्य जनता धास्तावली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.