जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्याने भावातही वाढ होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या भावात ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन लाल टमाटे १००० रुपये प्रती क्विंटलवरून १५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. कांदे, इतर भाज्यांमध्येही भाव वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात असलेल्या ३५ क्विंटल आवकमध्ये घट होऊन या आठवड्यात केवळ २२ क्विंटल टमाट्याची आवक झाली. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ३०० ते १००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव ४५० ते १७५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. गेल्या आठवड्यात १६०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असलेल्या बटाट्याचे भाव या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत.