रोज ८०० नमुने तपासणी : प्रयोगशाळेला सात महिने पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेला ७ महिन्यांचा कालावधी लोटला असून, या प्रयोगशाळेची क्षमता आता वाढून नियमित या ठिकाणी ८०० ते ९०० स्वॅब तपासणी केली जात आहे. सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांच्याकडे सुरुवातीपासून या प्रयोगशाळेची प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
२२ मे २०२० रोजी प्रयोगशाळेची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात सूक्ष्म जीवशास्त्र विभागात सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला या ठिकाणी दिवसाला अडीचशे स्वॅब तपासणी होत होती. आता ही क्षमता वाढून या ठिकाणी आता ८०० ते ९०० स्वॅब तपासणी होत आहे. दरम्यान, या ठिकाणी डॉ. किशोर इंगोले, डॉ. डांगे या प्रमुख अधिकाऱ्यांसह १६ अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसाला सरासरी ७०० स्वॅब तपासणीला येत आहेत.