लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि लॉकडाउन लागले. पण, काही महिन्यांनी त्यात शिथिलता मिळताच, पुन्हा धावपळीच्या आयुष्याला सुरूवात झाली. मात्र, त्याला पुन्हा कोरोनाचे ग्रहण लागले. प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले अन् रात्री उशिरापर्यंत काम करणारी माणसे ही पुन्हा दहा बाय दहाच्या खोलीत अडकून पडली. २४ तास घरातचं अडकल्यामुळे मोकळीस मिळेनाशी झाली. याचा परिणाम म्हणून कौटूंबिक कलहात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नैराश्य, आर्थिक चणचण, घरात बसून त्रासलेली अवस्था आणि कुटूंबातील वाद यामुळे काही वाद तर घटस्फोटाच्या टोकाच्या निर्णयापर्यंत आली आहे. गेल्या तीन महिन्यात कौटूंबिक कलहाच्या सुमारे सव्वाशे ते दीडशे तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारातील महिला सहाय्य कक्षाला प्राप्त झाल्या आहे.
महिला व बालकांसाठी सहाय्य कक्षात समुदेशक म्हणून शोभा हंडोरे व विद्या सोनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाकडे दाखल असलेल्या प्रकरणात पती-पत्नीसह दोन्हीकडील कुटूंबांना एकत्र बोलवण्यात येते. त्यांच्यात समजूत घालून गैरसमज दूर केले जातात. ज्या प्रकरणात तडजोड शक्य नाही. संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कौटूंबिक कलहाच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष कार्यालयात बोलविणे शक्य नसल्यामुळे फोनद्वारे त्यांची गैरसमज दूर करून पुन्हा पती-पत्नीस एकत्र आणले जात आहे. सुमारे सव्वाशे ते दीडशे तक्रारी तीन महिन्यात प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी बरेच प्रकरणे मिटली असून पती-पत्नी आनंदाने राहत आहेत.
आर्थिक चणचण आणि मोबाईलमुळेही वाढले वाद
- लॉकडाउनमुळे काम बंद पडले. शिथिलता मिळाली म्हणून पुन्हा कामाला सुरूवात झाली. मात्र, कोरोनाचा कहर पुन्हा वाढल्यामुळे हातातील काम गेले. आवक कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे संसारात वादाची ठिणगी पडली. त्यामुळे मारहाणीचे प्रमाणही वाढले.
- मोबाईलचा अतिवापर, त्यात एकमेकांचे असलेले काही गुपीत गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर दुरावा वाढला आहे आणि दोघांमध्ये नैराश्य वाढले आहे. वाद विकोपाला जावून सुरूवातीला प्रकरणे शाब्दीक आणि नंतर हिंसक वळणावर गेली.
- ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सुध्दा वाढल्या आहेत. बँकेच्या रांगेत उभे रहावे व शेवटी मुलाने परस्पर पैसे काढून घेतल्याचे कळते. यामुळे सुध्दा वाद होत असल्याचे सांगण्यात आले.
असे आहे प्रकरण...
१) कोरोनामुळे नोकरी गेली नाही. पण, पगार वेळेवर नाही किंवा अर्धा पगार झाला. कुटूंबाचा खर्च वाढला मात्र नेहमीपेक्षा अधिक वाढला. रोजच्या सवयींना लगाम लागला. त्यात नैराश्यामुळे चिडचिड वाढली. अन् यामुळे पती-पत्नीत वादाची ठिणगी पडली. हे प्रकरण महिला सहाय्य कक्षात आले व त्यांनी समजूत घातली. क्षुल्लक कारणावरूनही वाद होवून घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत प्रकरणे जात आहेत.
२) कडक निर्बंधामुळे सध्या घरी असून सुध्दा मोबाईलवर अधिक वेळ घालविणे. यामुळे देखील पती-पत्नीत वाद होत आहे. अशीही तक्रार महिला सहाय्य कक्षात प्राप्त झाली आहे. दरम्यान, हा दुरावा दूर करण्यासाठी महिला सहाय्य कक्षातून समुपदेशन करण्यात आले आहे.
या लॉकडाउनच्या काळामध्ये कुटूंबामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यात आर्थिक अडचण ही मुख्य बाब आहे. पण, आता कडक निर्बंध आहे. त्यामुळे दिवसभर लोक घरातचं असतात आणि जशी कामे व्हायला हवी, तशी ती होत नाही. सतत एकमेकांसमोर राहणे. बाहेर विरंगुळाला जागा नसणे. हा भाग चिडचिडीला कारणीभूत होतो. त्यामध्ये सुरूवातीला पुरूष घर कामात महिलांना मदत करायचे. आता करीत नाही. त्यामुळे स्त्रीयांवर कामाचा ताण वाढला आहे. परिणामी, त्यांची चिडचिड आणि मनस्थिती बिघडत आहे. दुसरीकडे पुरूषांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. या व्यसनांमुळे गृह कलह वाढण्याची शक्यता जास्त असते.
- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ