लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात व जळगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयात अजून २६५ बेड वाढवले आहेत. यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक इमारत मनपाने ताब्यात घेतली असून आता महापालिकेकडे एकूण १३०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्ण संख्या वाढली तर महापालिकेकडून पुन्हा काही सेंटर सुरू करण्यात येतील अशी माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.
शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिकेने लागलीच अभियांत्रिकी महाविद्यालयातील बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित केले होते. त्यात जसजसे रुग्ण वाढत होते त्याचप्रमाणे महापालिकेने या सेंटर मधील बेडची संख्यादेखील वाढ ठेवली आहे. सद्यस्थितीत या सेंटर मध्ये ५१० रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू असून, या ठिकाणी ६०० हून अधिक बेड खाली आहेत. मात्र, भविष्यात रुग्ण वाढले तर खबरदारी म्हणून काही बेड वाढविण्यात आले आहेत. यासह जळगाव तालुक्यातील कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना देखील महापालिकेच्याच सेंटरमध्ये भरती करण्यात येत आहे. महापालिकेने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सातवी इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी २६५ बेडची व्यवस्था केली आहे.
कंटेन्मेंट झाेनमध्ये पुन्हा बॅरेकेटिंग
काेराेनाच्या पहिल्या लाटेत शहरात ठिकठिकाणी दिसलेले कंटेन्मेंट झाेनची व्याप्ती दुसऱ्या लाटेत छाेट्या छाेट्या झाेनमध्ये रूपांतरीत झाली आहे. हाॅटस्पाॅट ठरणाऱ्या भागात पुन्हा बॅरेकेटिंग करण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी पत्रे ठाेकून घरातील प्रवेश बंद करण्यात येत आहेत. काही दिवसांपुर्वीच केंद्राच्या समितीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी काॅन्टॅक्ट ट्रेसींग तसेच कंटेन्मेंट झाेनवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने काेराेनाचे एकापेक्षा जास्त रूग्ण आढळून आलेल्या हाॅटस्पाॅटवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार महापालिकेने रायसाेनी नगर, विठोबा नगर, देवेंद्र नगर, संभाजी नगर,गणेश काॅलनी, डी मार्ट जवळ, कांचन नगर, अयाेध्या नगरात बॅरेकेटिंग केले आहे. गेल्या महिनाभरात रूग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. एकाच घरात चार ते पाच जण पाॅझिटिव्ह आल्याने त्या घराला पत्रे ठाेकून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी महापालिकेकडून संपूर्ण गल्ली वाहतुकीसाठी बंद केली जात हाेती. परंतु यंदा लहान लहान कंटेन्मेंट झाेनवर भर दिला जात आहे. गरजेनुसार व जागेनुसार त्याचे नियाेजन केले जात आहे. काही ठिकाणी थेट प्रवेश बंदी तर काही ठिकाणी गेटवर पत्रे लावले जात आहे. कुठे केवळ बाेर्ड लावून नागरिकांना सावध केले जात आहे. बाधित कुटुंबियांच्या संपर्कात काेणी येऊ नये तसेच संसर्ग वाढू नये यासाठी पालिकेकडून उपाययाेजना सुरू आहेत.