जळगाव : जळगावातील सात व्यापाऱ्यांना ४५ लाख ६६ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या नीलेश वल्लभभाई सुदाणी (३९, रा.वराछा, सुरत) या संशयिताची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यास मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. सुनावणअंति त्यास १६ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
२५ डिसेंबर २०२० रोजी नीलेश हा जळगावात आला होता. त्याने बनावट ओळखपत्रांच्या आधारावर शहरातील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते. गंडा घातल्यानंतर तो पसार झाला होता. तीन वेळेस एमआयडीसी पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांच्या शोधार्थ सुरतीची वारी केली होती. अखेर १० रोजी त्यास पकडण्यात यश आले होते. नंतर त्यास १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यास न्या. प्रीती श्रीराम यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंति नीलेश सुदाणी याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इतर संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना
व्यापाऱ्यांना गंडा घातल्याच्या या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचा शोध एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, सुरत येथे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.