लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनात आता ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के ॲन्टिजन चाचण्यांचे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी म्हणून जळगाव शहरात स्थानिक पातळीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवून ॲन्टिजन चाचणीसाठी निकष ठरवून देण्यात आले आहेत. सरसकट ॲन्टिजन चाचणी न करण्याचे नियोजन असून संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने हा लपलेला विषाणू शोधण्यासाठी हे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोनाच्या चाचण्या होत असतात. जिल्ह्यात १३ जुलैपासून ॲन्टिजन तपासणीला सुरुवात झाली अगदी १५ ते २० मिनिटात अहवाल समोर येत असल्याने या चाचण्यांसाठी आग्रह वाढला व हळूहळू आरटीपीसीआरपेक्षा या चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मात्र, आता नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार या चाचण्यांसाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.
किट पुरेसे
तपासणी केंद्रांवर ॲन्टिजन होत नसल्याने या किटचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या; मात्र प्रशासनाकडे तपासणी किट पुरेशा उपलब्ध आहेत; मात्र शासनाकडूनच तपासण्यांचे निकष ठरवून देण्यात आल्याने या तपासण्या कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे नेमके नियोजन?
तपासणीला येणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टिजन चाचणी न करता, केवळ हायरिस्क कॉन्टॅक्ट, लक्षणे असलेले व उपचाराची गरज असणारे रुग्ण, एखाद्या आजाराचा उपचार करायचा असल्यास कोरोना चाचणी आवश्यक असणारे रुग्ण, शस्त्रक्रियेचे रुग्ण अशांचीच आता ॲन्टिजन चाचणी केली जात आहे. सरसकट तपासणीला येणा-या अन्य सर्वांची आरटीपीसीआर चाचणीच केली जात आहे; मात्र दुसरीकडे अहवाल प्रलंबित राहत असल्याने रुग्णांसमोरही वेगळा पेच निर्माण झाला आहे.
असे नियोजन का?
जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक होते, तेव्हा बाधितांना तातडीने स्वतंत्र करणे गरजेचे होते. त्यामुळे सरसकट सर्वांची ॲन्टिजन तपासणी करून तातडीने विषाणूचा शोध घेऊन रुग्णाला विलगीकरणात ठेवले जात होते. आता एकत्रित वातावरणातच संसर्गाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाची ॲन्टिजन चाचणी केल्यास नेमके निदान होणार नाही. शरीरातील लपलेल्या विषाणूला शोधण्यासाठी आरटीपीसीआर हेच सध्या स्थितीत मुख्य माध्यम असल्याने त्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.