मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी राजकीय पक्षांचा उमेदवारीचा घोळ काही अद्याप संपताना दिसत नाही. खान्देशात नंदुरबार, धुळे मतदारसंघातील दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत तर जळगाव मतदारसंघात भाजपाची उमेदवारी अनिश्चित आहे. रावेरमध्ये राष्टÑवादी आणि भाजपा दोघांच्या उमेदवारीचे चित्र धूसर असून एकमेकांच्या हालचालीवर पुढील रणनीती आखली जात आहे. खडसे यांच्या नव्या विधानामुळे उमेदवारीचा घोळ वाढला आहे. राजकीय चर्चेनुसार पक्षश्रेष्ठी स्वत: खडसे यांनी उमेदवारी करावी, या मताचे आहेत. परंतु, खडसे यांची इच्छा नाही. शरद पवार हे देखील खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असल्याने उमेदवार जाहीर करीत नाही. राफेलच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष मोदी आणि अंबानी यांच्या लाभदायी मैत्रीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता थेट अंबानींच्या निवासस्थानाचा मुद्दा मांडतो, यामागे निश्चित भूमिका वाटते. पुढील काळात त्या भूमिकेमागील राजकारण स्पष्ट होईल.तिकडे नंदुरबारात धनगर आणि आदिवासी सवलतीचा मुद्दा काँग्रेसने प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविला आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार के.सी.पाडवी यांनी आमदारकीचा देऊ केलेला राजीनामा हा रणनीतीचा भाग आहे. आदिवासींमधील रोष दूर करण्यासाठी भाजपा आमदारांनी पत्रकार परिषदा तर घेतल्या, पण आदिवासींपर्यंत जाऊन हा गैरसमज असेल तर दूर करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, हे आव्हान आता भाजपापुढे राहणार आहे.रावेर, नंदुरबारमध्ये भाजपापुढे नवीन अडचणी उभ्या राहिल्या आहेत, त्यासोबतच धुळ्यातही उपमहापौर कल्याण अंपळकर यांनी महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत राजीनाम्याचा इशारा दिल्याने धुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविलेल्या भाजपामध्ये सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे. अंपळकर या निष्ठावंत असल्याने त्यांच्या नाराजीमुळे पक्षांतर्गत खदखद समोर आली आहे. पाणी योजनेच्या ठेकेदारावर केलेली मेहेरनजर, आरोग्याधिकारी नियुक्तीवरुन मतभेद हे प्रकार पाहता जळगावसोबतच धुळे भाजपामध्ये अंतर्गंत मतभेद वाढू लागल्याचे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती भाजपासाठी सुखावह नाही.जळगावात खासदार ए.टी.पाटील यांच्या उमेदवारीवर गंडांतर येण्याची शक्यता लक्षात घेऊन माजी मंत्री एम.के.पाटील, डॉ.संजीव पाटील, प्रकाश पाटील, आमदार उन्मेष पाटील, डॉ.बी.एस.पाटील, प्रा.अस्मिता पाटील, डॉ.सुरेश सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, पाचोऱ्याचे शांताराम सोनजी पाटील यांच्यासह डझनभर उमेदवारांनी प्रयत्न चालविले आहेत.एकनाथराव खडसे यांनी अंबानी यांना केलेले लक्ष्य पाहता भाजपाच्या रावेरमधील उमेदवारीविषयी अनिश्चितता स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांचा भुसावळ दौरा आणि खडसे यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आणि जळगावात झालेल्या आढावा बैठका पाहता पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यात समेट झाल्याचे वाटत होते. पण खडसेंच्या नव्या विधानावरुन सारे काही आलबेल नाही, असेच दिसून येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात उलथापालथीची शक्यता बळावली आहे.धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती देण्यात येईल, या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे खान्देशातील आदिवासी समाजामध्ये असंतोष पसरला आहे. नंदुरबार मतदारसंघ तर आदिवासींसाठी राखीव आहे, त्याशिवाय रावेर आणि धुळे या मतदारसंघात आदिवासी समाजाचे मतदान परिणामकारक ठरु शकते. काँग्रेसने हा मुद्दा प्रभावीपणे उचलून जनसामान्यांपर्यंत नेला. आमदार के.सी.पाडवी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.. भाजपाचे आमदारद्वयी डॉ.विजयकुमार गावीत आणि उदेसिंग पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
भाजपापुढील अडचणींमध्ये पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:15 AM