लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील गणेश कॉलनी मार्गावरील ख्वॉजामिया चौकातील अतिक्रमण काढण्याचा मागणीसाठी बुधवारी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी नगरसेविका दीपमाला काळे व सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना घेराव घातला. महापालिकेत ढोलताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करत मनपा आयुक्तांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी आयुक्तांना घेराव घालण्यात आला. यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात उपमहापौर सुनील खडके, महिला-बाल कल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, किशोर बाविस्कर, प्रशांत पाटील, मीनाक्षी पाटील, गणेश सोनवणे, माजी नगरसेवक नितीन पाटील यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. भाजप नगरसेवकांसह शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, प्रशांत नाईक व गणेश सोनवणे यांनीदेखील आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला. पदाधिकाऱ्यांसोबत या अतिक्रमणामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने रहिवाशांचादेखील आंदोलनात सहभाग होता. यामध्ये बंटी नेरपगारे, केदार देशपांडे, धीरज पाटील, प्रवीण राणे, नेमिचंद छाजेड, राहुल अवस्थी, डॉ. रितेश पाटील, योगेश पाटील, प्रवीण भोळे, अविनाश भोळे, संजय चौधरी, प्रमोद खाचणे, हेमंत चौधरी, वंदना कोष्टी, अर्चना पाटील, मालू पाटील, मंगला पाटील, पूनम पाटील, अलका पाटील, संदीप इंगळे, याेगेश पाटील, प्रशांत निशानदार, उज्ज्वल रायसोनी, राजदीप शर्मा, चंद्रशेखर मगर आदी नागरिकांनी सहभाग घेतला होता.
सात वेळा निवेदने देऊनही कारवाई नाही
ख्वॉजामियाच्या अतिक्रमणाबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे वर्षभरापासून पाठपुरावा करून आणि महासभेत वारंवार प्रश्न उठवूनही कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याने नगरसेविका दीपमाला काळे यांनी यावेळी सांगितले. महासभा सुरू होण्याआधी भाजपच्या नगरसेवकांनी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. त्यानंतर मनपा आयुक्त महापालिकेत आल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. याबाबत चर्चा करून व पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. मात्र, आंदोलक अधिक तीव्र असल्याने आयुक्तांनी चर्चा न करताच पुढे निघून गेले.
कायदेशीर बाबी तपासूनच कारवाई करणार : महापौर
महासभा संपल्यानंतर दुपारी २.३० वाजता महापौरांच्या दालनात आंदोलक नगरसेवक व महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महापौर भारती सोनवणे यांनी दिले. तसेच कारवाई करण्याआधी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक यंत्रणा तयार करावी लागणार असल्याचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलकांनी मनपा प्रशासनाला अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, कारवाई न केल्यास अतिक्रमणाच्या ठिकाणी आंदोलन करू, असा इशारा भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे व नगरसेवक सचिन पाटील यांनी दिला आहे.