लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या ९ ते १० वर्षांपासून प्रतिक्षेत असल्याने आता अनेकांची वयोमर्यादा बाद होण्याच्या मार्गावर असल्याने तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणी करीत जिल्ह्यातील जि.प.च्या अनुकंपाधारकांनी जि. प. समोरच गुरूवारी बेमुदत साखळी उपोषण पुकारले आहे.
नोकरी नसल्याने कुटुंबार उपासमारीची वेळ असल्याचे या अनुकंपाधारकांनी नमूद केले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहे. असे असतानाही अनुकंपा नियुक्ती देण्यात येत नाही. त्यामुळे यादी कमी न होता, वाढत जात आहे. ३० जुलै रोजी वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा भरतीवर कोणतेही निर्बंध नाही असे सांगितले आहे. ५ ऑगस्टच्या ग्राम विकास विभागाच्या पत्रानुसार सरळ सेवेच्या विविध संवर्गातील रिक्त पदांना अनुसरून २० टक्के पदभरती करण्यास शासनाने स्पष्ट सांगितले आहे. मात्र, नियुक्ती मिळत नसल्याचे या अनुकंपाधारकांनी म्हटले आहे. न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन पुकारले असून या उपोषणाची दखल न घेतल्यास न्यायालयात जावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी किरण साळुंखे, सचिन हिवरकर, सुप्रिया सपकाळे, साजीद तडवी, अजय सोनवणे, योगेंद्र विसपुते, असलम तडवी, मुबारक तडवी, मुकेश चौधरी, मयुर पाटील, राजेश तडवी, प्रदीप महाजन, उमेश मराठे, चंद्रकांत घतागडे, प्रशांत जाधव, विशाल जाधव, अजय महाजन, रोहित श्रीखंडे, नितीन खैरनार, विशाल देवराज आदी उपस्थित होते.