- विजयकुमार सैतवाल जळगाव : प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान असलेल्या स्वातंत्र्य दिनाचा यंदा अमृत महोत्सव साजरा होत असताना घरोघरी तिरंगा फडकणार आहे. मात्र दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीदेखील मिळालेले नाही. त्यामुळे आठ दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्यदिनापर्यंत पालकमंत्री नियुक्ती होऊन त्यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल की जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते हे ध्वजारोहण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लाले आहे.
गेल्या दीड महिन्यात राज्यातील सत्ता समीकरणे बदलले असून महाविकास आघाडीत असलेलेच आमदार आता युती सरकारमध्ये आहे. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असे दोनच मंत्र्यांवर राज्याचा कारभार सुरू असून मंत्रिमंडळ विस्ताराची शिंदे गटात गेलेल्या आमदारांसह भाजप आमदारांनाही प्रतीक्षा आहे. त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्ह्यांना पालकमंत्रीदेखील मिळालेले नसल्याने आठवडाभरावर आलेल्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोणाच्याहस्ते होणार, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.
निर्णय लांबणीवरमंत्रिमंडळ विस्तार प्रत्येक वेळी लांबत आहे. न्यायालयात शिवसेना व शिंदे सेनेचा लढा सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबविला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता हा न्यायालयीन लढादेखील १२ ऑगस्टपर्यंत लांबला आहे. त्यामुळे त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल व १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यंदाचे ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्याहस्ते होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा आहे पर्यायपालकमंत्री नियुक्त असतानादेखील स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी ते प्रकृती अस्वास्थ अथवा इतर कोणत्याही कारणाने ध्वजारोहणासाठी पोहचू शकले नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार सध्या पालकमंत्री नसले तरी व १५ ऑगस्टपर्यंत काही निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण होऊ शकते.
आठवडाभरात निर्णयाची शक्यता?मंत्रिमंडळ विस्तार होत नसला तरी व स्वातंत्र्यदिनापर्यंत तो झाला नाही तरी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण होण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती वरिष्ट पातळीवरून मिळाली. आठवडाभरात कोणता तरी निर्णय होणारच असल्याचे सांगण्यात आले.