ऑनलाईन लोकमत /अजय पाटील
जळगाव ,दि. 4 : आयसीसी चॅम्पीयन्स टॉफी स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र भारतीय क्रीडा प्रेमींना 4 जून रोजी भारताच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणा:या सामन्याची उत्सुकता आहे. या ‘हायहोल्टेज’ सामन्यासाठी सट्टे बाजारातदेखील मोठी उलाढाल होणार असून जळगावात या सामन्यावर लाखोचा सट्टा लागला आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान या दोन्ही संघासोबतच सामन्यादरम्यान पाऊस येईल की नाही ? यावरदेखील मोठा सट्टा लागल्याची माहिती सट्टा बाजारातील सूत्रांनी दिली आहे.
भारत विरुध्द पाकिस्तान या दोन संघादरम्यान सामना राहिला की, क्रीडा प्रेमींची उत्सुकता नेहमीच शिगेलाच पोहचली असते. तसेच आयसीसी चॅम्पीयन्स टॉफी सारख्या मोठय़ा स्पर्धेत जर हे दोन संघ एमकेकांना भिडत असले तर बुकिंचेही या सामन्याकडे लक्ष असते. त्यानुसार या सामन्यावर सुमारे 50 लाखांहून अधिक सट्टा लागला असल्याची माहिती आहे. सामन्याचा पहिल्या चेंडूपासूनतर शेवटच्या षटकार्पयत सट्टा लावण्यात आला असून, यासाठी ऑनलाईन पध्दतीने सट्टा लावला जात आहे. भारतीय संघात कोणत्या अकरा खेळाडूंना जागा मिळेल यावरदेखील सट्टा लावण्यात आला आहे.
बुकींच्या मते भारत मारणार बाजी
पाऊस न आल्यास व सामना झाल्यास हा सामना भारत जिंकणार असल्याचा अंदाज बुकींकडून काढण्यात आला आहे. यासाठी बुकींनी मागच्या काही सामन्यांचा आधार घेतला आहे. सध्या भारतावर 25 ते 50 पैसे असा भाव आहे. तर पाकिस्तानवर 50 पैसे ते 1 रुपया असा भाव निश्चित करण्यात आला आहे.
पावसाच्या हजेरीवर 25 पैशांचा भाव
रविवारी होणा:या या सामन्यादरम्यान ब्रिटनच्या हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा सामना रद्ददेखील होण्याची शक्यता आहे. यामुळे बुकिंकडून भारत-पाकिस्तानच्या संघाप्रमाणेच पावसावरदेखील सट्टा लावला जात आहे. सामन्यादरम्यान पाऊस येण्याचा शक्यतेवर 25 पैसे असा भाव लावण्यात आला आहे. तर पाऊस न येण्याचा शक्यतेवर 75 पैशांचा भाव निश्चित करण्यात आला आहे. तसेच पाऊस आल्यास व सामना रद्द होतो की डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे सामना होतो यावरदेखील सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जळगावच्या बुकींच्या नजरा इंग्लडमधील एजबेस्टन शहराच्या हवामानावर खिळल्या आहेत.