जळगाव : तालुक्यातील फुपणी येथील निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांनी भारत वर्ल्ड रेकॉर्ड केला असून, यामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. भागवत तुकाराम सपकाळे हे एअरपोर्ट हायस्कूल, विलेपार्ले, मुंबई येथील कला शिक्षकपदावर कार्यरत असून, ते मूळचे जळगाव तालुक्यातील फुपणी येथील आहेत.
काही चित्रकार जन्माला येतात ते विजयाचे व कर्तृत्वाचे झेंडे घेऊन. जीवनाचे सोने करण्यासाठी स्वतःच्या जन्माचे सार्थक करण्यासाठी, आपल्या उद्धारासाठी आणि पर्यायाने जनतेच्या उद्धारासाठी त्यांचा जन्म होत असतो आणि ते विजयाची साक्ष देणारे स्तंभ होतात, विद्यार्थ्यांना प्रकाश देणारे निसर्ग चित्रकार होतात. प्रचंड लोकसंग्रह, सामाजिक संवाद साधणारे एक निर्मळ अत्यंत प्रामाणिक दयाळू व निष्ठावंत आपल्या संस्कृतीत जे जे काही मधुर व मंगल आहे त्या सर्वांचा वारसा लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजेच भागवत सपकाळे. त्यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार, महात्मा गांधी दर्शन पुरस्कार, महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार २०२० तसेच निसर्गचित्राचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर, आर्ट गॅलरी कोहिनूर आर गॅलरीमध्ये भरले आहे. निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक व चित्रकला स्पर्धा आयोजित करणे यांच्यात त्यांचा विशेष सहभाग असतो.
सपकाळे यांनी भारत वर्ल्ड रेकॉर्ड करत २५ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या कुंचल्यातून जलरंगातील विविध छटांद्वारे तब्बल दोनशे निसर्गचित्र रंगविण्याचा विश्वविक्रम केला आहे. यावेळी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, कलानिर्मिती फाइन आर्ट सोसायटी उपाध्यक्ष किशोर बाविस्कर, मनोहर बाविस्कर, प्रताप सोनवणे, प्रवीण पवार, मनोज महारनवर इतर मान्यवर उपस्थित होते. हा विश्वविक्रम नोंदवून फुपणीसह परिसर व जळगाव जिल्ह्याचा झेंडा देशात फडकविल्याबद्दल सपकाळे यांच्यावर परिसरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.