लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अयोध्यानगरातील घरफोडीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या पवन ऊर्फ भुऱ्या रामदास आर्य (रा. इंदूर, मध्यप्रदेश) याने द्राैपदीनगरात चार लाखांची घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात जिल्हा पेठ पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
महामार्गाला लागून असलेल्या द्राैपदीनगरात राजी जयप्रकाश नायर यांच्याकडे २ फेब्रुवारी रोजी रात्री घरफोडी झाली होती. त्यात एक लाख रुपये रोख व तीन लाख रुपयांचे दागिने चोरी झाले होते. या गुन्ह्यात भुऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी भुऱ्याला न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे ॲड. आशा शर्मा यांनी बाजू मांडली. दरम्यान, भुऱ्याविरुद्ध हा २० वा गुन्हा आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्ह्यात तो कारागृहात होता.
कोठडी आणि कारागृहात आमदारासोबतच
भुऱ्याला ज्यादिवशी अटक केली त्याच दिवशी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व इतर शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. दोन्ही एमआयडीसी पोलिसांच्या कोठडीत होते. त्यानंतर दोघांना एकाच दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांची कारागृहात रवानगी केली. पोलीस कोठडी ते कारागृह दोघे सोबतच होते. शनिवारी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.