जामनेर तालुका
मोहन सारस्वत
जामनेर तालुक्याला लागलेला औद्योगिक मागासलेपणाचा शाप काही केल्या दूर होण्याची चिन्हे दिसत नाही. सहकार तत्त्वावरील साखर कारखाना, स्टार्च प्रकल्प, रम कारखाना, सूत गिरणी यांची राजकारण्यांनी लावलेली वाट उघड्या डोळ्यांनी नागरिकांनी पहिली. गोंडखेळ येथील नियोजित साखर कारखान्यात अडकलेले शेतकऱ्यांचे भागभांडवल अजूनही परत केले जात नाही. स्टार्च व रम प्रकल्प राजकारण्यांच्या हातात होते तोपर्यंत सुरूच झाले नाही, खासगी उद्योजकांनी घेताच सुरू झाले. रम प्रकल्पाने अवघ्या तीन वर्षातच दम तोडला, तर स्टार्चने चांगली सुरुवात केली. मका उत्पादकांनादेखील त्याचा फायदा झाला, बेरोजगारांनाही रोजगार मिळाला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून स्टार्चला टाळे लागल्याने सहकारातील एकमेव प्रकल्पदेखील बंद पडला. स्टार्च बंद झाल्याने सुमारे ५०० कुटुंबाचा रोजगार बुडाला. प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना लाभदायक ठरेल अशा टेक्सटाइल पार्कच्या उभारणीस तत्कालीन राज्य शासनाने मंजुरी दिली. जामनेरजवळ औद्योगिक वसाहतीच्या उभारणीस सुरुवात झाली. जमीन अधिग्रहण होऊन शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळण्याची प्रतीक्षा आहे. टेक्सटाइल पार्क होणे गरजेचे आहे. त्यामुळे कापसाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या कापसाला भावसुद्धा मिळेल. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल. महाविकास आघाडीने टेक्सटाइल पार्कसाठी निधी देताना हात आखडता घेतल्याने काम रखडले, असा आरोप होत आहे. शासन कुणाचेही असो जनतेच्या हिताचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते.