कुंदन पाटील, जळगाव : सोन्याच्या दरात शनिवारी प्रति तोळा ३०० रुपयांची घट झाली.त्यामुळे ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोन्याची खरेदी केली. सोनतुकडा आणि अंगठ्यांच्या खरेदीला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले.
या आठवड्यात सोने दरात मोठी घट सुरु आहे.गुरुवारी सोन्याचा प्रतितोळा ६१ हजार रुपये भाव होता. शुक्रवारी मात्र हा दर ४०० रुपयांनी कमी झाला. त्यानंतर शनिवारीही सोन्याचे दर २०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला ६० हजार ३०० रुपयांचा भाव राहिला. हा मुहूर्त साधत दुपारनंतर ग्राहक सोने खरेदीकडे वळले.
तुकड्याला मागणी
अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सोन्याच्या तुकड्याला पसंती दिली.अनेकांनी आर्थिक परिस्थितीनुसार सोन्याचा तुकडा खरेदी केला. तर महिलांचा यंदा अंगठी खरेदीकडे कल दिसून आला. त्यापाठोपाठ सोनपोत, हाफ पोतला पसंती दिली. कमी वजनाच्या दागिन्यांना मोठी मागणी होती, अशी माहिती सराफी व्यावसायिकांनी दिली.
चांदी वधारली
गुरुवारी चांदीचा दर प्रतिकिलो ७५ हजार ८०० होता.शुक्रवारी ६०० रुपयांनी दर घसरले. त्यामुळे चांदी ७५ हजार २०० वर आली.शनिवारी मात्र चांदी २०० रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदीचा ७५ हजार ४०० प्रतिकिलोने विक्री झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"