लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, नागरिक व बाधित रुग्णदेखील बेजबाबदारपणे वागताना दिसून येत आहेत. मंगळवारी महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमधून तंबाखू घेण्यासाठी एक बाधित रुग्ण पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच महापौर भारती सोनवणे यांनी केअर सेंटरमध्ये जाऊन महापालिकेच्या यंत्रणेला व सुरक्षारक्षकांना चांगलेच धारेवर धरत याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित रुग्णावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचनादेखील महापौरांनी वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत.
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या देखरेखीसाठी महापालिकेकडून रोज कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. मात्र काही रुग्ण या ठिकाणीदेखील बेजबाबदारपणे वावरत असून, महापालिकेच्या यंत्रणेलाच आव्हान उभे करीत आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजता केअर सेंटरच्या क्रमांक दोनमधील एक रुग्ण महापालिकेची सुरक्षा यंत्रणा भेदून पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महापालिकेच्या प्रशासनाचा कर्मचाऱ्यांनी माहिती घेतल्यावर संबंधित रुग्ण तंबाखू घेण्यासाठी बाहेर पडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काही महापालिका कर्मचाऱ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात पाहणीदेखील केली; मात्र हा रुग्ण आढळून आला नाही. याबाबत महापौर भारती सोनवणे यांना माहिती मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात भेट दिली.
महापालिकेचे कर्मचारी व सुरक्षारक्षकांना महापौरांनी घेतले धारेवर
संबंधित रुग्ण अभियांत्रिकी महाविद्यालयातून पसार का झाला याबाबतचा खुलासा महापौरांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मागविला. महापौरांनी थेट संबंधित रुग्णाच्या रूमपर्यंत जाऊन इतरांकडून माहिती घेतली. गेल्या तीन दिवसांपासून हा रुग्ण भरती झाला होता. तसेच त्याला सौम्य लक्षणे आढळून आली होती. केअर सेंटरमधील काही रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण अनेक वेळा इतर रुग्णांसाठीदेखील काही वस्तू व काही पदार्थ घेण्यासाठी अनेक वेळा बाहेर गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली.
त्या रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
चार तास शोध घेतल्यानंतरही संबंधित रुग्ण आढळून आल्याने महापौरांनी संबंधित रुग्णावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय विभागाला दिले आहेत. तसेच अशाच प्रकारे जर कोणताही रुग्ण बाहेर जात असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. दरम्यान, काही रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेकडून कारवाई होईल या भीतीनेही हा रुग्ण काही काळ बाहेर लपून बसला असल्याची शक्यता वर्तवली आहे.
कोट
महापालिकेचे कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र बाधित रुग्णांना याचे कोणतेही गांभीर्य नसून, बेजबाबदारपणे कोणतेही वस्तू व पदार्थ घेण्यासाठी सेंटरमधून बाहेर पडत आहेत. अशा रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- भारती सोनवणे, महापौर