लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनाच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर चार महिन्यात सहा रुपयांनी वाढले आहे. तर उज्ज्वला योजनेत प्रत्येक घरात गॅस दिल्यानंतर आता सरकारने ३ फेब्रुवारीपासून गॅस सिलिंडरमध्येदेखील २५ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सामान्यांचे जिव्हाळ्याचे विषय असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासूून सातत्याने या दरांमध्ये वाढ होत असल्याने सामान्य नागरिक वैतागले आहे. त्यांचे दर महिन्याचे खर्चाचे गणित त्यामुळे बिघडले आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरातदेखील सरकारने वाढ केली आहे. तीन फेब्रुवारीपासून ७२४ रुपये दर केले आहे. त्यात २५ रुपयांनी वाढ केली आहे.
आधीच कोरोनाच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपल्या रोजगाराला मुकावे लागले होते. लहान व्यापारी अडचणीत आले होते. त्यानंतर च्या काळात सरकारकडून या दरांमध्ये कपात करून नागरिकांना काही अंशी का होईना, पण दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र येथेही सरकारने त्यांची निराशाच केली आहे. या महागाईने नागरिकांचे खर्चाचे गणित बिघडले आहे.
कोट - आधीच कोरोनाच्या काळात व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यात ही अशी वाढ होत राहिली तर महिन्याचे खर्चाचे गणित बिघडते. पेट्रोलचे भाव तर सातत्याने वाढत आहे. बहुतेक लवकरच सेन्चुरी मारणार - गौरव पाटील, व्यावसायिक.
कोट
पूर्वी शंभर रुपयात एक लीटरपेक्षा जास्त पेट्रोल येत होते. आता पेट्रोलचा दर ९४ रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पेट्रोलही कमी मिळते. त्यामुळे वारंवार पेट्रोल भरण्यासाठी यावे लागते. दर वाढल्याने गाडीचा वापर कमी केला आहे. शक्य तेथे पायी जातो. -सचिन दुसाने, दुचाकी चालक.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे खर्च देखील वाढला आहे. इतर वस्तूचे दर वाढल्याने हाती येणाऱ्या पैशांमध्ये घर कसे चालवावे, असा प्रश्न उभा राहिला आहे. - अनिता पाटील, गृहिणी.
आकडेवारी
पेट्रोल १ नोव्हेंबर - ८८.९३
१ डिसेंबर ९०.९३
१ जानेवारी ९१.२८
१ फेब्रुवारी ९४.०६
डिझेल
१ नोव्हेंबर ७६.८७
१ डिसेंबर ७९.०३
१ जानेवारी ८०.५१
१ फेब्रुवारी ८०.५१
गॅस सिलिंडर
१ नोव्हेंबर ६९९.५०
१ डिसेंबर ६९९.००
१ जानेवारी ६९९.५०
१ फेब्रुवारी ६९९.५०
३ फेब्रुवारीपासून ७२४.५०