जळगाव - महागाईने जनता अक्षरश: हैराण झाली आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ, खाद्य तेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईच्या निषेर्धात राज्यात, देशात अनेक ठिकाणी निदर्षणे करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी महागाईसंदर्भात आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
सदाभाऊ खोत यांनी जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा नावाने यात्रा सुरू केली आहे. नाशिकनंतर आता त्यांचं हे अभियान चाळीसगांवला पोहोचलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदाभाऊंचा राज्यव्यापी दौरा सुरू असून ते आज जळगावात पोहोचली. कोकणापासून निघालेली 'जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा हा संवाद' आज जळगाव जिल्ह्यात आला. सदाभाऊ खोत यांनी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आघाडी सरकारचे धोरणांसह पवार कुटुंबीयांवार जोरदार टीका केली.
पत्रकारांनी सदाभाऊंना पेट्रोल-डिझेल यासह जीवानावश्यक वस्तू महागाईवरून प्रश्न विचारला असता त्यांनी महागाईचे समर्थन केले. तसेच, कशाची महागाई आली हो, 20 हजाराचे सोनं 50 हजार तोळा झालं तरी लोक घेतात ना? तेव्हा महागाई दिसत नाही, देशी क्वार्टर आता 150 ते 200 रुपयांना मिळायला लागली आहे. मग, महागाई नाही वाढली का? महागाई झाली तरी लोकं दारू पिणं सोडता का? कांदा डाळींच्या किंमती वाढल्यास शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावाच सदाभाऊंनी केला. 150 रुपयांची क्वार्टर तुम्ही पिऊ शकता मग आमच्या गायीचं दूध 100 रुपयांने का पिऊ शकत नाही. दारू 80 टक्के लोक पितात, पैशावाले सगळे दारू पितात, असेही खोत यांनी म्हटले. तर, महागाईच्या समर्थनार्थ बोलायचं धाडस कोण करेल का, पण मी महागाईबद्दल बिनधास्त बोलतो, असेही त्यांनी म्हटलं.