कुंदन पाटील, जळगाव: अवकाळी पावसामुळे उत्पादनाची आवक कमी झाल्याने कोरड्या लाल मिरचीसह मसाल्यांचा बाजार यंदा महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातला झणझणीत फोडणीचा स्वाद काहीसा फिका पडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे देशभरातील शेत उत्पादन अडचणीत आले आहे. त्याचाच फटका मिरचीच्या उत्पादनाला बसला आहे. यंदा नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर भागातील गावरानी मिरचीचे उत्पादनही घटले आहे. तसेच वारंगलहून (आंध्र प्रदेश) होणारी आवकही घटली आहे. त्यामुळे मिरचीपेक्षा बाजार ‘तेज’ झाला आहे. तसेच खडा मसाल्याचा बाजारही महागला आहे. वेलदोडा, शोप, जीऱ्यातही दरवाढ झाली आहे. धने मात्र स्वस्ताईचा सुगंध पेरत आहेत. अन्य मसाल्याचे घटकांचे भाव मात्र स्थिर आहेत. खाद्य तेलांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा आहे.
लोणच्यात महागाईचे तरंग
जून महिन्यात लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगबग राहणार आहे. पहिल्या पावसानंतर या बाजाराला सुरुवात होते. वादळी पावसामुळे आमराईदेखिल झडून पडल्या आहेत. त्यामुळे यंदा कैऱ्यांच्या बाजारातही तेजी असणार आहे. त्यामुळे यंदा लोणच्यावर महागाईचे तरंग असणार आहे.
उत्पादनाचा घास तोंडाशी आला असताना अवकाळीचा मार बसला. त्यामुळे मिरचीसह सर्वच उत्पादन घटले. परिणामी बाजारात तेजी आली आहे. -सचिन बरडिया, होलसेल मसाले विक्रेते
गतवर्षाचा साठाही संपला आणि तशातच यंदाही उत्पादन घटले. परिणामी सर्वच वाणांची मिरचीचे दर वाढले आहेत. -संजय शिंपी, किरकोळ मिरची विक्रेते
गतवर्षी आणि यंदा मसाल्यांचे दर (प्रतिकिलो)
- प्रकार- २०२२- २०२३
- वेलदोडा- १९००- २९००
- धने- १८०- १४०
- बडीशोप- २८०- ३५०
- जीरे- ४००- ५२५
वाणनिहाय मिरचीचे प्रतिकिलोप्रमाणे तुलनात्मक दर (कंसात २०२३ चे दर)
२०२२- मध्यम दर्जा- उत्तम दर्जा गावरानी- २००-२२५- २५०-२७५ (३००-३५०)- (४००-४२५)चपाटा- ३२५-३००- ३५०-४०० (४००-४५०)- (५५०-६००)रसगुल्ला- ३००-६००- ६००-७०० (७००-८००)- (८००-९७०)काश्मिरी- ४००-५००- ५५०-६०० (६००-८००)- (७००-८००)