लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच असून त्याचे भाव कमी होण्याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महिनाभरानंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात भाववाढ होऊन तेलाचे भाव १३० ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रति किलोवर पोहोचले तर सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १६० ते १६५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. हे अद्यापही कायम असून यामुळे ग्राहकांना चांगलेच महागाईला सामोरे जावे लागत आहे.
इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असल्याने तेवढा दिलासा आहे.
शेंगदाण्याचेही भाव चढेच
गेल्या आठवड्यात भगरचे भाव वाढून ते १०० ते ११० प्रति किलोवर पोहोचले होते. त्यात थोडी नरमाई आली आहे. मात्र शेंगदाण्याचे वाढलेले भाव अद्यापही कायम असून ते १२५ ते १३० रुपये प्रति किलोवर आहेत. मात्र साबुदाणा ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
द्राक्षाचे भाव झाले कमी
द्राक्षाची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव कमी होण्यास मदत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ८० रुपये प्रति किलोवर असलेली द्राक्षे आता ५० रुपयांवर आली आहेत.
लिंबू वधारले
उन्हाळ्यामध्ये लिंबूला मागणी वाढते. त्यानुसार आतादेखील लिंबूला मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून ३० ते ४० रुपये प्रति किलो असलेले लिंबूचे भाव आता थेट ४० ते ५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
खाद्यतेलाचे भाव वाढलेले असताना ते भाव कमी होण्याची प्रतीक्षा आहे. त्यात आता अवकाळी पाऊस झाल्याने पुन्हा महागाईची चिंता आहे.
- दिलीप महाजन, ग्राहक
खाद्यतेलाचे भाव वाढलेलेच असून ते अजूनही कमी झालेले नाही. इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर आहे.
- मनोज वाणी, व्यापारी
अवकाळी पावसाने भाज्यांच्या आवकवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या लिंबूचे भाव वाढले आहेत.
- राजू चौधरी, भाजीपाला विक्रेते