सुनील पाटील,आॅनलाईन लोकमत जळगाव दि,२५ : देशभरात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याची अथवा आरोपीची माहिती हवी असेल तर आता तपासाधिकाºयांना त्या-त्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. या गुन्ह्यांची माहिती तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडली जाणार असून त्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत देशभरातील सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी आॅनलाईन झालेच पाहिजे अशी तंबी वजा आदेश केंद्र सरकारने काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजीटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यांचे डिजीटालायझेशन हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘विप्रो’ या आयटी कंपनीला कंत्राट दिला असून ही कंपनी देशभरात पोलीस ठाण्यांना सॉफ्टवेअर पुरवित आहे. जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक तर आयुक्तलयाच्या स्तरावर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली संगणक शाखा व सायबर शाखेच्या माध्यमातून हे काम सुरु आहे.
१९९८ या वर्षापासूनचा डेटा संगणकात समाविष्ट
जळगाव जिल्ह्यात २०१५ पर्यंतचा डेटा समाविष्ट झालेला आहे. पोलीस ठाण्यांचे काम पेपरलेस होणार ‘डिजीटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे पेपरलेस करण्याचा प्रयत्न केंद्रीय गृहमंत्रालयाचा आहे. त्याचाच भाग म्हणून पोलीस यंत्रणेसाठी ‘सीसीटीएनएस’ प्रणाली तर सामान्य नागरिकांसाठी सीटीजन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला या पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या आपली तक्रार नोंदविणे असो की सामान्यांशी निगडीत माहिती या पोर्टलवर मिळत आहे.
पोलिसांचे काम अधिक सोपे
सायबर कक्षाच्या एका अधिकाºयाच्या मते हे काम करताना सध्या प्रचंड त्रास होत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम मात्र खूप चांगले असणार आहेत. एखाद्या आरोपीची माहिती काढायची असेल तर तो राहत असलेल्या क्षेत्राच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करुन माहिती घ्यावी लागत होती. यासाठी वेळ, मनुष्यबळ व खर्चाचा विषय येत होता. आता मात्र गुन्हगाराचे नाव संगणकावर क्लिक केले की त्याची कुंडलीच समोर येईल. त्या गुन्हेगारावर देशभरात कुठे, किती व कोणते गुन्हे दाखल आहेत तसेच त्याची सद्यस्थिती जसे की तो कारागृहात आहे, पोलीस कोठडीत आहे किंवा जामीनावर आहे याची अद्ययावत माहिती लागलीच मिळू शकणार आहे. त्यामुळे पोलिसांचे काम अतिशय सोपे होणार आहे.