ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.7 - शहरात अनधिकृत नळ कनेक्शनवर केलेली कारवाई, त्यापोटी केलेला दंड याबाबत गत तीन वर्षात माहितीच संकलित नसल्याचे मनपा स्थायी समिती सभेतील चर्चेदरम्यान शुक्रवारी समोर आले.
मनपा स्थायी समितीची सभा सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विषय पत्रिकेवरील 5 विषयांवर चर्चा झाली. प्रभाग समिती क्रमांक 2 अंतर्गत योगेश्वर नगरातील एका व्यक्तीची पाणीपट्टीच्या आकारणीची रक्कम 9 हजार 333 रुपये निर्लेखित करण्याचा विषय चर्चेत आला असता भाजपाचे सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील अनधिकृत नळ संयोजनांबाबत माहिती विचारली. शहरात एकूण नळ संयोजन किती, त्यात अधिकृत कनेक्शन किती, अनधिकृत नळ संयोजनांचे सर्वेक्षण केले काय? नळ संयोजनांचा घरगुती वापर व व्यावसायिक वापर, किती नळ संयोजनांचे बिल निर्लेखित करण्यात आले? याबाबत पाणी पुरवठा विभागास माहिती विचारली. मात्र तीन वर्षात अनधिकृत नळ संयोजनांची माहितीच घेण्यात आली नसून असे नळ संयोजन आढळल्यास ते मनपाची कर आकारणी करून नियमित केले जात असल्याचे पाणी पुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी सांगितले.