(फोटो : २३ सीटीआर ५३ व ५४ मयतांचे फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओमसाई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. आशाबाई यांचा मृतदेह किचनच्या बाजूच्या खोलीत, तर मुरलीधर यांचा मृतदेह गच्चीवर होता. या खुनाचे कारण व मारेकरी अजून निष्पन्न झाले नाही.
रात्रीच झाला आहे खून
मुरलीधर व आशाबाई दोघांच्या गळ्यावर फास दिल्याचे व्रण आहेत, तर शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. शरीरावरील व्रण पाहता ही घटना रात्रीच झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गच्चीवर मुरलीधर पाटील यांच्या मृतदेहाजवळ महिलेची चप्पल आढळून आली, ही चप्पल आशाबाई यांची नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय पोर्चमध्ये खाट पडलेली होती, त्यावर अंथरूण होते. पाटील खाटेवर झोपल्याचा संशय असून, मारहाण करणार्यांनी त्यांना गच्चीवर आणले असावे याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृतदेहापासून काही अंतरावर दोरी आढळून आली आहे.
घटनेमागे नेमके कारण काय?
या खुनाच्या घटनेमागे नेमके काय कारण आहे व मारेकरी कोण याचा पोलीस तपास करीत आहे. मालमत्ता, पैसा किंवा दरोडा आहे का? की काही वेगळे कारण आहे याची पडताळणी पोलिसांनी सुरू केलेली आहे. शेजारीपाजारींकडूनदेखील माहिती काढली जात आहे.
एसपींकडून घटनास्थळाची पाहणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक निरीक्षक अमोल मोरे यांनी पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.