स्टार ७६३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात झाल्यानंतर महिना-दीड महिना केंद्रांना एका दिवसाचेही टार्गेट पूर्ण करता येत नसल्याची परिस्थिती होती. मात्र, आता लस येतात आणि एका दिवसात संपतात, अशी परिस्थिती असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातही लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अगदी सुरुवातीला असलेले गैरसमज कोरोनाच्या भीतीत दूर पळाल्याचे चित्र सद्या जिल्ह्यात आले. आरोग्य यंत्रणेला लसींबाबतीत वारंवार विचारणा होत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. सुरुवातीला सात केंद्रे होती. मात्र, दिवसाला एका केंद्रावर शंभरजणही लस घेत नव्हते, अनेक केंद्रांचे हे टार्गेटही पूर्ण होत नव्हते. लसीकरणासाठी आवाहन करावे लागत होते. जेव्हा सामान्यांना लसीकरण सुरू झाले, तेव्हाही लोक केंद्रांवर येत नव्हते. अधिकारी व प्रशासनाला वारंवार आवाहन करावे लागत होते. मात्र, लसीकरण केंद्रावर शुकशुकाट राहत होता.
असे होते गैरसमज
महिलांना मासिक पाळीत लस घेता येत नाही, हा गैरसमज आताही असून, याचे अनेक वेळा स्त्री रोगतज्ञांनी स्पष्टीकरण केले आहे. यासह अगदी सुरुवातीच्या काळात लसीकरणामुळे वंध्यत्व येते, मृत्यू होतो अशा अफवांना ऊतही आला होता. याचाही काहीसा लसीकरणावर परिणाम झाला होता. मात्र, आता त्या उलट लसीकरणाचा वेग वाढला आहे. लस मात्र, त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीय.
कोरोनाचा कहर आणि लसीकरणाला वेग
कोरोनाचा जिल्हाभरात कहर वाढल्यानंतर शिवाय विविध टप्प्याचे लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वच ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातही आता लस कधी येतील याची वाट बघितली जाते. आरोग्य विभागाकडून आता अनेक उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू केले आहे. ग्रामस्थ येतात व लस घेतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता दिवसाला १६ ते १७ हजार लसीकरण होत आहे. जिल्ह्यातील ३४ खासगी केंद्रांनाही परवानगी मिळाली असून, शहरातील एका खासगी केंद्रावरही सरासरी ८०० लोक रोज लस घेत आहेत.
ग्रामस्थ काय म्हणतात
कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी आधी मनात खूप भीती होती. त्यामुळे सुरुवातीला घेण्याचे टाळले. मात्र, कालांतराने जवळच्या अनेक नातेवाइकांना लस घेतल्यावर कोणताच त्रास होत नसल्याचे लक्षात आल्यावर लस घेण्यासाठी पुढे आलो. कोविड लसीबाबतचे मनातील सर्व गैरसमजही दूर झाले.
- अलका पाटील, ममुराबाद
कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काहीएक त्रास झाल्यास रोजच्या कामांवर विपरीत परिणाम होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे बरेच दिवस लस घेण्यासाठी मागेपुढे पाहत होतो. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शेवटी एकदाची लस घेतली; पण कोणताच त्रास झाला नाही. दुसऱ्याच दिवशी पूर्ववत कामाला लागलो.
- योगेश पाटील, ममुराबाद
ग्रामीण भागात अगदी सुरुवातीला काही गैरसमज होते; मात्र, आता लसीकरणाबाबत सरपंच, उपसरपंचांचा फोन येतो व लसींबाबत विचारणा केली जाते. लोकांचा ग्रामीण भागात प्रतिसाद वाढला आहे. - डॉ. समाधान वाघ, माता व बालसंगोपन अधिकारी.