भुसावळ,दि.11- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाचशे मीटर आतील शहरातील 47 दारू दुकाने बंद झाल्यानंतर माजी पालकमंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी मात्र रस्त्यांचे हस्तांतरण पालिकेकडे करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र दिल्याचे उघड झाले आह़े हा नेमका काय प्रकार आहे,यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दारू दुकाने वाचवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतल्याची उघड टीका समाजमनासह सोशल मीडियातून होत आहे तर दुसरीकडे 15 वर्षापूर्वीच सा़बां़विभागाने पालिकेकडे हे रस्ते हस्तांतरीत केल्याचे पुरावे असल्याने संबंधित विभागापुढे संभ्रम वाढला आह़े
जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती
राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतची 500 मीटर आतील मद्य दुकाने, वाईन शॉपी व देशी दारूची दुकाने बंद करण्यासंदर्भातील आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढल्यानंतर 1 एप्रिलपासून जिल्हाभरातील मद्य दुकानांना टाळे लागले होते मात्र जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी आदेशातून पळवाट शोधत राज्य व राष्ट्रीय मार्ग महानगरपालिकेकडे वळवण्याचा घाट घातला होता. मात्र नागरिकांच्या पुढाकाराने हा प्रयत्न फसला होता़ भुसावळातही नेमक्या जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आह़े महसूलमंत्र्यांना पत्र
अंतिम निर्णय पालिकेचा : आमदार संजय सावकारे
दारू दुकाने वाचवण्याचा प्रश्नच येत नाही़ अंतिम निर्णय घेण्याचा पालिकेला अधिकार आह़े प्रत्यक्ष कागदपत्रावरून 15 वर्षापासून नगरपालिकेकडे रस्ते हस्तांतरण झाल्याचे दिसून येते तरीदेखील याबाबत संभ्रम आह़े सुमारे दोन वर्षापूर्वी याच रस्त्यांसाठी तत्कालीन सत्ताधा:यांनी कामे करू देण्यास व नाहरकत देण्यास अडवणूक केली होती़ रस्त्यांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची की नगरपालिकेची ही बाब स्पष्ट झाली पाहिजे, जेणेकरून आगामी काळात निधी आणावयाचा म्हटल्यास नेमका सा़बां़ वा पालिकेच्या माध्यमातून आणावयाचा हे स्पष्ट होईल, असे आमदार सावकारे म्हणाल़े