जळगाव : मार्च २०२० नंतर देशभरात कुठेही बॉक्सिंग किंवा अन्य खेळांच्या
स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. असे असले तरी अनेक खेळाडूंची खेळण्याची
जिद्द कायम आहे. जळगावच्या दिशा विजय पाटील हिने स्कूल गेम्समध्ये कांस्य
आणि खेलो इंडियात सुवर्णपदक पटकावले असले तरी त्यानंतर तिला स्पर्धा
खेळायला मिळाली नाही. मधल्या काळात जेव्हा कोरोनाचा संसर्ग कमी झाला
होता. तेव्हा तिची निवड पुन्हा एकदा राष्ट्रीय सराव आणि प्रशिक्षण
शिबिरासाठी झाली होती. मात्र आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ती
घरी आहे. सध्या तिच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. तिला
विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असली तरी तिची पुन्हा एकदा
गरुड भरारी घेण्याची तयारी कायम आहे. दिशा हीने सुरूवातीला जळगावला
प्रशिक्षक नीलेश बाविस्कर यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आहे.
२०१८ मध्ये तिने बॉक्सिंगला सुरुवात केली. त्यावेळी ती १७ वर्षाआतील गटात
खेळत होती. त्यावर्षी तिला फारसे यश मिळवता आले नाही. मात्र २०१९ च्या
सत्रात तिने सुरुवातीला आंतरशालेय राज्यस्तरीय स्पर्धा आणि नंतर
संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला दम दाखवला. त्यानंतर त्यातून
तिला स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत
खेळण्याची संधी मिळाली. यावेळी तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
मात्र इथून पुढे तिला क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या स्पर्धेत १७
वर्षाआतील बॉक्सिंग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे तिने सोने
केले व सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर राष्ट्रीय संघटनेच्या
प्रशिक्षण आणि सराव शिबिरात रोहतक, हरियाणा येथे जाण्याची तिला संधी
मिळाली. तेथे ती पहिल्या रँकमध्ये होती. मात्र त्याच वेळी देशात कोरोनाचे
रुग्ण सापडायला सुरूवात झाली. आणि ती जळगावला परतली. नंतर काही
महिन्यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. त्याचवेळी तिला
खांद्याला आणि पायाला दुखापत झाली ती जळगावला परतली. त्यानंतर कोरोनाच्या
दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले.
दिशाची राष्ट्रीय स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा, रोहतक - पराभूत
स्कूल गेम्स फेडरेशनची आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धा, नवी दिल्ली २०१९ कांस्य पदक
खेलो इंडिया गेम्स २०२० - गुवाहाटी सुवर्णपदक
रोहतकहूनच सुरूय ऑनलाईन प्रशिक्षण
६० ते ६४ किलो गटात खेळणारी दिशा पाटील ही सध्या जळगावमध्ये असली तरी ती सध्या बॉक्सिंगचे रोहतक येथील प्रशिक्षकांकडून ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. आता काही दिवसातच निवड चाचणी होणार आहे. त्यासाठी सराव सुरू आहे. सध्या खांद्याला दुखापत झालेली असली तरी त्याशिवाय करता येणाऱ्या इतर व्यायाम प्रकारांचा सराव सुरू आहे. दररोज सकाळी साडेपाच ते सात आणि सायंकाळी ५ ते ७ सराव केला जात असल्याची माहिती दिशा हिने दिली.