श्याम सराफ
पाचोरा (जि. जळगाव) : दहीहंडी फोडताना जखमी झालेला गोविंदा नितीन पांडुरंग चौधरी (वय ३५, रा. पाचोरा) याचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पाचोरा येथे घडली होती.
पाचोरा शहरातील स्टेशनरोड परिसरात युवकांनी मंगळवारी सायंकाळी दहीहंडीचे आयोजन केले होते. यात गोविंदा असलेला नितीन हा दहीहंडी फोडताना खाली पडला आणि जखमी झाला. त्याला लागलीच खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी २:३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले. सायंकाळी नितीनवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. नितीन हा रिक्षा चालक होता.