लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दैनंदिन कंत्राटी कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना बोनस, भविष्य निर्वाह निधी, पगारी रजा न देणे इत्यादी विषयांसंदर्भात कामगार उप आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारीवरून ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिस व कुलगुरुंना २ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कामगार उपआयुक्तांनी दिले आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दैनंदिन कंत्राटी कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना बोनस, भविष्य निर्वाह निधी, पगारी रजा न देणे या विषयीची तक्रार ॲड. कुणाल पवार यांनी १३ जानेवारी रोजी कामगार उप आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेत कामगार उप आयुक्तांनी ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिस तसेच विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या नावे पत्र पाठवून या प्रकरणाशी संबंधित सर्व कार्यालयीन कागदपत्र घेऊन २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता कामगार उप आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.