भुसावळ : कोरोना महामारी लक्षात घेता साकेगाव येथील ग्रामस्थांनी चालू वर्षाचा संपूर्ण कर भरल्यास तथा थकीत बाकी भरल्यास विविध सवलती व सुवर्ण बक्षीस योजना हा ग्रामपंचायत प्रशासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी ग्रा.पं. प्रशासनाच्या उपक्रमास साथ देत ग्रामस्थांनी लाखावर कराचा भरणा केला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या हस्ते कर भरणा करणाऱ्यांना पाण्याचा जार व डस्टबिन वाटप करण्यात आलेस्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत प्रशासन सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. चालू वर्ष २०२१/२२ चा संपूर्ण कर भरल्यास पाच टक्के सूट व वर्षभर दररोज २० लीटर मोफत आरो पाणी देण्यात येणार आहे. तसेच १२ ते ३१ मे २०२१ दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी लकी ड्रॉ योजना आयोजित केली आहे.प्रथम बक्षीस १० ग्रॅम सोन्याची चैन, द्वितीय बक्षीस एक ग्रॅम सोन्याची नथ, तृतीय बक्षीस पाच पैठणी साड्या व ५० जार प्रत्येकी एक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून लकी टॅक्सधारकांना वाटप करण्यात येणार आहे. १० हजार थकीत बाकी भरणाऱ्या प्रत्येक करधारकास पाण्याचा एक जार भेट म्हणून देण्यात येईल. ५० हजारावर संपूर्ण थकीत बाकी भरणाऱ्या ग्रामस्थांना पाच टक्के सूट देण्यात येईल. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक डस्टबिन मोफत देण्यात येईल.अशा विविध भेटवस्तू व डिस्काउंट योजना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या हितासाठी व गावाच्या विकासासाठी निर्माण केली आहे.दरम्यान, ग्रा.पं. प्रशासनाच्या या अभिनय उपक्रमास ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी लाखावर कराचा भरणा केला. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनावणे, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार, वासेफ पटेल, राजेश अग्रवाल, ग्रा.पं. सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.