लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उंदीरखेडा ता. पारोळा येथील शिक्षणसंस्था व सेवानिवृत्त शिक्षक संभाजी वामन पाटील यांच्यातील तक्रारीच्या चौकशीकामी उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी संस्थाचालक व सेवानिवृत्त शिक्षक पाटील यांना कार्यालयातच चौकशीसाठी बोलावले होते. विशेष बाब म्हणजे हे शिक्षक आजारी असून त्यांचा मुलगा गाडीत त्यांना घेऊन आला होता. या प्रकाराची दिवसभर जिल्हा परिषदेत चर्चा सुरू होती.
उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री. नागेश्वर शिक्षण मंडळाच्या उंदीरखेड माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संभाजी वामन पाटील यांना निवृत्तीवेतन देण्यात येऊ नये, अशी संस्थेची तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेली होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याची चौकशी माझ्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर यात सर्वांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी संस्थाचालक आणि शिक्षक संभाजी पाटील यांना कार्यालयात बोलावले होते. शाळेत गेले असते तर सेवानिवृत्त शिक्षक तिथे भेटले नसते,म्हणून त्यांना कार्यालयात बोलवल्याचे कल्पना चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, संस्थाचालकांनी येणार नसल्याचे पत्र दिले आहे. तर संभाजी पाटील यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधी संस्थेने त्यांना निलंबीत केल्याचे त्यांनी नमूद केले असून संस्थाचालकांचे म्हणणे ऐकूण यावर निर्णय देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, बरे नसल्याने तुम्ही कळवून दिले असते तर बरे झाले असते असेही आपण संभाजी पाटील व त्यांच्या मुलाला सांगितले होते. असेही उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सांगितले.