लोकमत ऑनलाईन चोपडा, दि.28 : चोपडा सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक एस. डी. चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष (चोपडा) यांनी औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे मनमानी कारभाराबाबत केलेल्या लेखी तक्रारीवरून त्यांनी जळगाव येथील प्रथम विशेष लेखापरीक्षक (वर्ग एक) सहकारी संस्था यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चहार्डी ता. चोपडा येथील साखर कारखान्यातील राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष डी.व्ही. ब:हाटे यांनी प्रभारी कार्यकारी संचालक एस. डी. चव्हाण यांच्या मनमानी कारभाराविरोधात 14 सप्टेंबर 2017 रोजी औरंगाबाद येथील साखर सहसंचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीत चव्हाण यांच्या विरोधात अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने चव्हाण यांचे कार्यकारी संचालकांच्या बोर्डावरील यादीत नाव नसतानाही त्यांच्याकडे कार्यकारी संचालकांचा पदभार देण्यात आला आहे. तसेच चोपडा साखर कारखान्यास साखर संघाकडून गाळपासाठी परवानगी नसतांनाही तो सुरू केला. तसेच 2014-15 या हंगामातील शेतक:यांचे ऊसाचे प्रतिटन सहाशे रुपये देणे बाकी असताना व शेतकरी ते पैसे मिळण्यासाठी उच्च न्यायालयात गेले असतानाही तीन शेतक:यांना चव्हाण यांनी पेमेंट अदा केले आहे. यासह इतर अनेक आरोप तक्रार अर्जात केलेले आहेत. त्या अर्जाची दखल औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक यांनी घेतली असून प्रभारी कार्यकारी संचालक चव्हाण यांच्या कारभारासंदर्भात जळगावातील प्रथम विशेष लेखापरीक्षक यांना 4 ऑक्टोबर 2017 रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत. आणि तक्रार अर्जातील मुद्यांवर सखोल चौकशी करून अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह त्यांच्या कार्यालयाकडे मागविला आहे. दरम्यान, प्रभारी कार्यकारी संचालक चव्हाण यांच्या चौकशीचे आदेश असले तरी आतापयर्ंत चव्हाण यांची कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नसल्याचे समजले आहे. अर्थात चव्हाण हे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रजेवरच असल्याचे समजले आहे .
‘चोसाका’तील प्रभारी कार्यकारी संचालकांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 7:25 PM
चोपडा सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक एस.डी. चव्हाण यांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देराष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष ब:हाटे यांनी केली होती तक्रार.प्रादेशिक सहसंचालकांनी मागविला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल.