गुढे ता. भडगाव : जिल्हा परिषदेच्या १६ अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर गुढे ग्रामपंचायतीची चौकशी केली. यात दहा कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतचे दप्तर तपासणी केली, तर पाच ते सहा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतमार्फत झालेल्या कामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
शुक्रवारी सकाळपासून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा-सोळा लोकांची टीम गुढे गावात आली. गावात झालेल्या कामांची प्रत्यक्ष जाऊन मोजणी करण्यात आली, शिवाय नागरिकांशी संवाद साधून माहिती घेत होते. अचानक आलेल्या टीमच्या चौकशीमुळे गावात एकच चर्चा होत होती.
ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विविध कामांत गैरव्यवहार झाल्याबाबतच्या तक्रारी गेल्या दोन वर्षांपूर्वी गावातील नागरिकांनी जि.प.चे सीईओ यांच्याकडे केल्या होत्या, परंतु चौकशीस विलंब होत असल्याने, काही नागरिकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करीत, या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. खंडपीठाने जि.प.कडे अहवाल मागितला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, गुढे गावात जि.प.ची टीम आल्याने गावात खळबळ उडाली होती.
कोट-
गैरव्यवहार असलेल्या कामांच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीमधील कागदपत्रांची तपासणी व गावातील कामांची पाहणी करून, त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सीईओ यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
- कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.