जळगाव : चाळीसगाव येथील आगार व्यवस्थापक व वरिष्ठ लिपिक यांच्या विरोधात रविवारी चाळीसगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती विभाग नियंत्रक यांच्याकडून महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आली आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून येत्या दोन दिवसात या प्रकाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी `लोकमत`ला दिली. तसेच या प्रकारामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन झाली आहे. चौकशी समितीतून जो कोणी दोषी आढळून येईल, त्यांच्यावर महामंडळ कारवाई करणार असल्याचेही जगनोर यांनी सांगितले.
चाळीसगाव येथील आगारप्रमुख संदीप निकम व वरिष्ठ लिपिक नितीन पाठक यांनी कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचारी महिलेशी लज्जास्पद कृत्य केल्याने, या दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू असून, या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांमधून होत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत विभाग नियंत्रक जगनोर यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकाराबाबत दोंषीवर कारवाईचे अधिकार महामंडळाला आहेत. मात्र, या प्रकारावरून दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळविली आहे. त्यांच्याकडून लवकरच या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीच्या चौकशीतून नेमके कोण दोषी आहे, हे सत्य समोर येईल. त्यानंतर महामंडळच संबंधितांवर कारवाई करेल, अशी माहिती जगनोर यांनी दिली.