जळगाव : जि.प. आरोग्य विभागातील कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे यांच्याबाबत एस.सी., एस.टी. आयोगाकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेत सुर्वे यांची खाते चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष भास्करराव हिवाळे यांनी दिली आहे. सुर्वे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याला साफसफाईचे काम सांगितल्यावरून वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे धाव घेतली होती. याबाबत प्रत्यक्ष आरोग्य विभागास भेट देऊन माहिती घेतली असता अनेक तक्रारी समोर आल्याचे हिवाळे यांनी सांगितले. मात्र, याबाबत जि.प. यंत्रणेने पाच महिन्यात कुठलीही कारवाई केली नसल्याचे भास्करराव हिवाळे, संजय सोनवणे, व्ही.बी. पाठक, रत्नमाला बागुल, निवेदिता ताठे, संजय लोखंडे, अशोक जाधव, शिवाजीराव जाधव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. दरम्यान, जि.प. सीईओंनी याबाबत चौकशी करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी यांना दिल्या असून ते लवकरच याबाबत लेखी जबाब नोंदविणार असल्याची माहिती आहे.
कोट
मी प्रशासन अधिकारी असल्याने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला कार्यालयीन काम सांगितले, यात कुठलाच जातीयवाद नाही. मीच सीईओंकडे संबंधितांबाबत तक्रार करणार आहे. नाशिक आयुक्तांनी केवळ नियमित पत्र पाठविले आहे. कुठल्याची चौकशीचा विषय नाही. - प्रतिभा सुर्वे, जि. प.