ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.19 - तालुक्यातील तळवेल येथील दुर्गेश सागर पाटील या मुलाच्या मृत्यू प्रकरणी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी यांची चौकशी भुसावळ प्रातांधिकारी यांच्याकडे सुरु झाली आहे.
प्रातांधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या 29 मे रोजी भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील दुर्गेश सागर पाटील या मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला. साप चावला त्यावेळी दुर्गेश याला जवळील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बालहक्क आयोगाकडे तक्रार
दुर्गेशचे वडील सागर पाटील यांनी दवाखान्यात डॉक्टर नसल्याने व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी नसल्याने दुर्गेशचा मृत्यू झाला. त्याला डॉक्टर जबाबदार आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे केली. आयोगाचे यशवंत जैन यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी चौकशीसाठी हे प्रकरण जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले. जिल्हाधिकारी यांच्याकडून हे प्रकरण भुसावळचे प्रातांधिकारी डॉ. चिंचकर यांच्याकडे चौकशीसाठी आले आहे. त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांची चौकशी झाली आहे. घटना घडली त्यावेळी ते रजेवर होते, अशी माहिती त्यांनी चौकशीत दिल्याचे डॉ.चिंचकर यांनी दिली.