एका सदस्याचा राजीनामा : बार रुम व महिला कक्षात असुविधांचे कारण
जळगाव, दि.30- जिल्हा वकील संघात अंतर्गत धुसफूस सुरु झाली असून त्याचाच परिणाम म्हणून की काय संघाचे कार्यकारिणी सदस्य अॅड.सचिन चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत अॅड.एल.व्ही.वाणी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे पॅनल विजयी झाले होते. संघाच्या उपाध्यक्षा अॅड.स्वाती निकम यांची मात्र बिनविरोध निवड झाली होती.
वकील संघाच्या कार्यकारिणीत अनेक दिवसापासून अंतर्गत धुसफूस सुरु आहे, मात्र त्याची जाहीर वाच्यता कुठेही होत नव्हती. अॅड.सचिन चव्हाण यांनी अध्यक्षांकडे राजीनामा पाठविला आहे. त्यात त्यांनी नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा असल्याचे म्हटले आहे. न्यायालयातील महिला कक्षात प्यायला पाणी नाही, कुलरची व्यवस्था नाही. 116 या वकीलांच्या कक्षातही मुलभूत सुविधा नाहीत. संघाचे अध्यक्ष या नात्याने आपण या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे वारंवार सांगितल्यावरही त्याची दखल घेण्यात आली नाही. ज्या वकील बांधवांना कार्यकारिणीला निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी सुविधा पुरवू शकत नसाल तर पदावर राहण्याचा मला कुठलाही नैतिक अधिकार नाही, असे अॅड.चव्हाण यांनी राजीनाम्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान,या राजीनाम्या संदर्भात वकील संघाचे अध्यक्ष अॅड.लक्ष्मण वाणी यांना विचारले असता चव्हाण यांचा राजीनामा अध्यक्ष या नात्याला मला किंवा संघाला प्राप्त झालेला नाही. त्यांनी व्हॉटस्अॅपवर राजीनामा दिलेला आहे. प्रसिध्दीसाठी हा खटाटोप असल्याचे वाणी यांनी म्हटले आहे.