लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी शासनाने २५० रुपये दर निश्चित केला आहे तर सरकारी रुग्णालयात ही लस मोफत दिली जात आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये लस दिल्यानंतर नागरिकांना औषधींसाठी ३०० ते ३५० रुपयांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले जात आहे. तसेच या औषधी त्यांच्याच मेडिकल वरून घेण्याबाबत नागरिकांना बंधनकारक केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला आहे.
मनपा स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, नगर सचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. सभेत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपाययोजनांसाठी घेण्यात आलेल्या काही कामांच्या विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
लसीकरणाचे सेंटर वाढवावेत
मनपा प्रशासनाकडून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. त्यावर मनपाकडून लाखोंचा खर्च करण्यात येत आहे. यापेक्षा मनपा प्रशासनाने लसीकरणाचे सेंटर वाढवले तर वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर काही प्रमाणात अंकुश लावण्यात मनपा प्रशासनाला यश येऊ शकते असे नितीन लढ्ढा यांनी सभेत केली. लसीकरणाची व्यवस्था ही सद्यस्थितीत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडण्याची गरज आहे. मात्र काही जणांकडून या समस्यादेखील व्यवसाय केला जात असल्याचाही आरोप नितीन लढ्ढा यांनी केला. यावेळी त्यांनी प्रिस्क्रिप्शन सभागृहात सादर केली.
मेडिकल चालक व खाजगी रुग्णालयांना दिल्या जातील सूचना
नितीन लढ्ढा यांनी केलेल्या आरोपानंतर आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगत, ज्या रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे नागरिकांची दिशाभूल केली जात असेल. त्या रुग्णालयांना व मेडिकल चालकांना सूचना दिला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तसेच याबाबत जिल्हाधिकार्यांना देखील ही माहिती दिली जाईल असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच शहरात मनपाकडून लसीकरणाचे सेंटर वाढविण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल अशीही माहिती आयुक्तांनी या सभेत दिली.
कोविड केअर सेंटर मधील सफाईसाठी दिला मक्ता
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. या सेंटर मधील साफसफाईच्या कामांसाठी अमरावती येथील या कंपनीला ४५० कर्मचारी पुरविण्याचा मक्ता देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. मात्र, संबंधित मक्तेदाराकडून ४५० कर्मचारी पुरविण्याचा करार केल्यावर देखील गेल्या वेळेस मक्तेदाराने केवळ ७० ते ८० कर्मचारी पुरविले होते याबाबत महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ही नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी केली. यासह केअर सेंटर मधील रुग्णांना नाश्ता व जेवण पुरविण्याबाबत देखील मक्ता देण्यात आला आहे. कोविड केअर सेंटरमधील नियोजनासाठी सोमवारची स्थायी समितीची सभा घेण्यात आली.