ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31- शासनाच्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मुख स्वास्थ तपासणी मोहिमेचा 30 रोजी जिल्हा रुग्णालयात समारोप झाला. या मोहिमेंतर्गत 30 डिसेंबर्पयत जिल्हाभरात जवळपास 10 लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर, कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक, दंत शल्य चिकित्सक डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. गोल्डी चावला, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, जी.एम. फाउंडेशनचे अरविंद देशमुख यांच्यासह ला.ना. विद्यालय नूतन मराठा महाविद्यालयाचे एनसीसी विभागाचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सेवेबद्दल डॉ. नीलेश चांडक यांचा सत्कारया मोहिमेंतर्गत 10 जणांना कर्करोग असल्याचे निदान झाले. यातील चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर डॉ.पी.एन. पाटील यांनी मोफत तपासणी करून दिली. या सोबतच आलेल्या रुग्णांची कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक मोफत तपासणी करून दिल्याबद्दल आरोग्य विभागाच्यावतीने डॉ. चांडक यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्या चौघांना कर्करोग आढळून आला त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.