लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फुले मार्केटमध्ये थांबविण्यात आलेली व्यापारी, कामगारांची कोरोना चाचणी मोहीम मंगळवारपासून (दि. २९) पुन्हा सुरू झाली आहे. या ठिकाणी १५० जणांची तपासणी केली तर आधीचे अहवालही या ठिकाणी वाटप केले. यासह तंत्रनिकेतनमध्ये ९० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ज्या लोकांचा अधिक लोकांशी संपर्क येत असतो, अशांची कोरोना तपासणी मोहीम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यात सर्वांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र, मध्यंतरी शासकीय प्रयोगशाळेवरील भार वाढल्याने ही मोहीम आठवडाभरापूर्वी थांबविण्यात आली होती. त्यानंतर आधीचे सर्व प्रलंबित अहवाल स्पष्ट झाल्यानंतर अखेर दिवसाला मर्यादित तपासण्यांचे उद्दिष्ट ठेवून ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या भागात १२०० पर्यंत व्यापारी, कामगारांच्या तपासण्या झालेल्या आहेत. त्यापैकी चार जण बाधित आढळून आले आहेत.