सुशील देवकर
जळगाव जिल्हा विशेष लेखा परिक्षक अधिकारी कार्यालयाच्या चौकशीसाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग नाशिक यांनी तब्बल ७ अधिकारी व ३ कर्मचारी असे १० दहा जणांचे पथक नेमले असून हे पथक गेल्या तीन दिवसांपासून या कार्यालयात ठाण मांडून आहे. या कार्यालयाची तपासणी करताना नियम, अधिनियम, शासन निर्णय व सहकार आयुक्त कार्यालयाकडील परिपत्रके यानुसार कामकाज केले जाते किंवा नाही? याबाबत तपासणी करण्यात येत आहे. तसेच तपासणी अहवाल गोषवाऱ्यासह आठ दिवसांत विभागीय सहनिबंधक कार्यालयास सादर केला जाणार आहे. या कार्यालयाची तपासणी झाली, याबाबत जिल्ह्यातील ठेवीदारांना आश्चर्य वाटलेले नाही. किंबहुना या ठेवीदारांनी व त्यांच्या संघटनांनी केलेल्या तक्रारींमुळेच ही चौकशी लागली आहे. राज्यातील सहकारी पतसंस्थांमधील सर्वाधिक घोटाळा हा जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चालकाच्या भ्रष्टाचारावर खरे नियंत्रण सहकार व लेखापरिक्षण विभागाचे असतानाही जो भ्रष्टाचार झाला तो नियंत्रणात आणणे व ठेवीदारांचे पैसे वसुल करणे शक्य असतानाही त्यादृष्टीने अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. दरवर्षी कोट्यवधींची कमाई सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी केल्याचे आरोप ठेवीदार संघटनांकडून होत आहेत. लेखापरिक्षणाची जबाबदारीही ठरावीक लेखापरिक्षकांवर सोपविल्याचा आरोपही झाला. या सर्वच तक्रारींची गंभीर दखल आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी घेतली. त्यातच नाशिक येथील बैठकीकडेही जिल्हा विशेष लेखापरिक्षकांनी पाठ फिरविल्याने चौकशीचे गंभीर पाऊल उलण्यात आल्याचे समजते. मात्र केवळ चौकशी होऊन अहवाल दाबला जाऊ नये, अशीच ठेवीदारांची अपेक्षा आहे.